नागपूर

नितीन गडकरींविरोधात विकास ठाकरे मैदानात

नागपूर – लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने चौथी यादी जाहीर केली आहे. त्याअंतर्गत नागपूर लोकसभा मतदारसंघातून आमदार विकास ठाकरे आणि रामटेक लोकसभा मतदारसंघातून रश्मी बर्वे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसने शनिवारी मध्यरात्री उमेदवारांची नावे जाहीर केली. यासोबतच गोंदिया भंडारा लोकसभा मतदारसंघातून डॉ. प्रशांत पडोळे आणि गडचिरोलीतून डॉ. नामदेव किरसान यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे.

जाहीर झालेल्या विदर्भातील चार जागांसाठी पहिल्या टप्प्यात म्हणजेच १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. मात्र, चंद्रपूरच्या जागेसाठी पक्षाने अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही. विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि वरोराच्या आमदार प्रतिभा धानोरकर या जागेवर सातत्याने दावा करत आहेत.

महाविकास आघाडीने रामटेक लोकसभा मतदारसंघ काँग्रेससाठी सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर काँग्रेसकडून कोणाला उमेदवारी दिली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात काँग्रेसकडून माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे हे प्रमुख दावेदार होते. तर रश्मी बर्वे यांना पक्षातील प्रमुख नेत्यांनी पसंती दिल्याचे समजते.