Uddhav Thackeray made a scapegoat - Bhagat Singh Koshyari
मुंबई

उद्धव ठाकरेंना बळीचा बकरा बनवले – भगत सिंह कोश्यारी

मुंबई, 20 फेब्रुवारी : महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलेय. उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदासाठी योग्य नव्हते. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंना बळीचा बकरा बनवले, या शब्दांत भगतसिंह कोश्यारी यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

उद्धव ठाकरे संत प्रवृत्तीचा माणूस आहे. त्यांनी राजकारणापासून लांब राहावे, अशी प्रार्थना मी देवापुढे करतो. कोणाच्या तरी सांगण्यावरून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले, त्यांनी संघटना चालवायला पाहिजे होती.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाच्या लायक नसताना त्यांना जबरदस्तीने तिकडे बसवण्यात आले. शरद पवारांसारखा मार्गदर्शकही उद्धव ठाकरेंना वाचवू शकला नाही, अशी टीका भगतसिंह कोश्यारी यांनी केली. भगतसिंह कोश्यारी महाराष्ट्राचे राज्यपाल असताना त्यांना मसुरी या ठिकाणी येथील एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जायचे होते.

प्रोटोकॉलनुसार त्यांना सरकारी विमानाने जायचे होते. मात्र राज्य सरकारकडून संमती न मिळाल्याने भगतसिंह कोश्यारी यांना विमानातून उतरावे लागले होते. या घटनेचा धागा पकडून भगतसिंह कोश्यारी यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला.

महाराष्ट्रात राज्यपाल असताना त्यांनी मला विमानातून उतरवले होते. आता नियतीने त्यांना खुर्चीवरून खाली उतरवले. मी त्यांना सत्तेतून खाली उतरवले नाही, असे सांगत, त्यांनी त्यांची संघटना व्यवस्थितपणे चालवायला हवी होती, असा सल्ला भगतसिंह कोश्यारींनी यावेळी दिला.