महाराष्ट्र

ओझर येथे बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकलीचा मृत्यू

ओझर – शिरोली खुर्द तालुका जुन्नर येथील पाटील मळा वस्तीवरील संपत केरू मोरे यांच्या शेतात वास्तव्यास असलेल्या मेंढपाळांच्या लहान मुलीला बिबट्याने पळवून नेत तिच्यावर हल्ला केला. यात तिचा मृत्यू झाला. ही घटना काल पहाटे घडली.

या घटनेनंतर गावातील व परिसरातील नागरिकही मोठया संख्येने जमले. त्यांनी आजूबाजूच्या शेतात मुलीचा शोध घेतला. ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून शोध घेतला असता तेव्हा एका शेताच्या जवळ मुलीच्या डोक्यातील टोपडे, फ्रॉक आढळून आला.पुढे काही अंतरावर चिमुकलीच्या शरीराचे काही भाग आढळून आले. उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र चौधर,सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी पंडीत थोरात,सागर शिंदे यांच्या पोलिस पथकासह घटनास्थळी जाऊन पंचनामा करून प्राप्त अवशेष शवविच्छेदनासाठी पाठवले. या परिसरात बिबटयाचा उपद्रव हा नागरिकांसाठी डोकेदुखीचा विषय असून वन विभागाने याबाबत ठोस उपाय योजना करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली.