राजकीय

“महाविकास आघाडीत ताळमेळ नाही”

मुंबई : अमरावती : महाराष्ट्रात महाविकास आघाडीमध्ये कुठलाच ताळमेळ नाही. या आघाडीची परिस्थिती अतिशय बिकट असून महाराष्ट्रात या आघाडीला केवळ दोन-तीन जागा मिळतील, असा दावा उत्तर प्रदेशचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजपचे महाराष्ट्र लोकसभा निवडणूक प्रभारी दिनेश शर्मा यांनी येथे केला.

पत्रकार परिषदेत शर्मा यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. ते म्‍हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान हा देशाचा आत्मा आहे आणि आत्मा कधीही मरत नाही, असे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. असे असताना २०२४ मध्ये मोदी पुन्हा सत्तेवर आले तर देशाचे संविधान बदलणार, असा खोटा प्रचार काँग्रेससह शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना महाराष्ट्रात करत आहे. खरेतर ही महाविकास आघाडी विकास आणि सनातनला विरोध करणारी आहे, असा आरोप शर्मा यांनी केला.

महाराष्ट्रात पंतप्रधान मोदी यांच्याबाबत लोकांमध्ये आदर आहे. काँग्रेसमध्ये काहीही ठीक चाललेले नाही. देशाच्या राष्ट्रपतींबाबतदेखील काँग्रेस पक्ष उलट-सुलट शब्‍दांचा वापर करीत आहे. देशात मनमोहन सिंह हे पंतप्रधान असताना भरसभागृहात राहुल गांधी यांनी अध्यादेश फाडून फेकला होता. संविधानाचा अनेकदा अवमान हा काँग्रेसनेच केला आहे.