ताज्या बातम्या

नांदेडमध्ये हळदी विक्रीचे पैसे वेळेत मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत

नांदेड – नांदेड बाजार समितीत यंदा हळदीला दरवर्षीच्या तुलनेत चांगला भाव मिळत असून १५ हजारांपासून ते १८ हजार ५०० रुपये क्विंटल दराने बाजार समितीत हळद खरेदी केली जात आहे. सध्या हळदीला चांगला भाव मिळत असला तरी वेळेवर पैसे मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहे. त्यात एक ते तीन टक्क्यांची कपात होत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. माल विकल्यानंतर २४ तासांत शेतकऱ्यांना पैसे मिळावे, असा बाजार समितीचा नियम आहे. याकडे अनेक व्यापारी आणि आडत दुकानदार दुर्लक्ष करत आहेत.

नांदेड-हिंगोली-परभणी या भागात मोठ्या प्रमाणात हळदीचे उत्पादन घेतले जाते. गेल्या वर्षी हळदीला एकरी कमी उतारा आला होता, दर घसरल्यामुळे शेतकऱ्यांनी हळदीकडे पाठ फिरविली. त्यामुळे यंदा या भागातील हळद लागवड निम्म्याने घटली होती. त्यातच अतिवृष्टी आणि हळदीवरील रोगांमुळे उत्पादनात घट निर्माण झाली. त्यामुळे मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी झाल्यामुळे हळदीचे दर सध्या वाढले आहेत. दर चांगले मिळत असले तरी मालविक्रीची रक्कम मिळण्यासाठी शेतकऱ्यांना दीड ते २ महिने वाट पाहावी लागते. त्यासाठी खरेदीदाराकडून पैसे आल्यावर शेतकऱ्यांचे पैसे अदा करु, असे कारण काही आडत व्यापारी पुढे करतात. मात्र, हेच आडत दुकानदार पैसे देण्यासाठी एक ते तीन टक्के कपात करतात. शेतकरी आणि आडत दुकानदारांनी समन्वयाने यातून मार्ग काढावा, असे आडत दुकानदार प्रल्हाद इंगोले यांनी सांगितले.