महाराष्ट्र

’20 वर्षांनंतर पहिल्यांदाच राज ठाकरे धनुष्यबाणाला मतदान करणार’

मुंबई – लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. त्यानंतर आज महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी आमदार सदा सरवणकर, मनसे नेते संदीप देशपांडे, माजी आमदार तुकाराम काते आणि इतर नेते उपस्थित होते. मुंबई दक्षिण मध्यमधून महायुतीकडून राहुल शेवाळे हे उमेदवार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. 17 मे रोजी महायुतीची सभा होणार आहे. याबाबत देखील राज ठाकरे यांनी सूचना दिल्याची माहिती राहुल शेवाळे यांनी दिली आहे.

राज ठाकरे यांनी सध्या तापमानाचा पारा चढता असताना प्रचारात स्वतः ची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला. प्रचार करताना सोबत गार पाण्याची बाटली, आणि उन्हाचा त्रास कमी करण्यासाठी सोबत ओला रुमाल ठेवण्याचा सल्ला राज ठाकरे यांनी दिला. असं राहुल शेवाळे यांनी सांगितले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट प्रेरणादायी ठरल्याचं राहुल शेवाळे म्हणाले. मनसेच्या स्थापनेनंतर जवळपास 20 वर्षांनंतर राज ठाकरे हे पहिल्यांदाच धनुष्यबाण चिन्हाला आपले मत देतील, ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट असल्याचं देखील ते म्हणाले. तसेच 17 मे च्या महायुतीच्या सभेत राज सर्वांना मार्गदर्शन करून महायुतीच्या उमेदवारांना आशीर्वाद देतील. असं राहुल शेवाळे म्हणाले.