अकोला

पोलिसांनी अकोला जिल्हाभर राबविले कोम्बिंग ऑपरेशन

१४ डिसेंबर अकोला: शहर व जिल्ह्यातील गुन्हेगारी वाढत असल्याने पोलिसांच्या कामगिरीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. अशा परिस्थितीत गुन्हेगारांवर वचक बसविण्यासाठी r रात्रभर जिल्ह्यातील सर्व पोलिस स्टेशनच्या हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. यात मोठ्याप्रमाणावर कारवाई करण्यात आल्याने गुन्हेगारांमध्ये धडकी भरली आहे.

पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी अकोला जिल्हा पोलिस दलाचा पदभार स्वीकारल्यापासून गुन्हेगारीचा आलेख वाढत आहे. गुन्हेगारांवर पोलिसांचा धाक उरला नसल्याने दिवसाधवळ्या चोर्‍या, वाटमारी, अत्याचाराच्या घटना घडत आहेत.परिणामी अकोला पोलिसांच्या कामगिरीबाबत नाराजीचा सूर होता. नुकत्याच विधान परिषदेच्या उपसभापती निलीम गोर्‍हे या अकोला जिल्हा दौर्‍यावर येऊन गेल्यात. त्यांनी पोलिसांसोबत विशेष बैठक घेवून सूचना दिल्या होत्या.

पोलिसांच्या कार्याबाबत नाराजीही व्यक्त केली होती. या सर्व पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री १० वाजतापासून ते बुधवारी पहाटे ५ वाजेपर्यंत जिल्ह्यातील सर्व पोलिस स्टेशन अंतर्गत कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले.या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये अप्पर पोलिस अधीक्षक, सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी, सर्व पोलिस स्टेशनचे प्रभारी यांच्यासह एकूण ४३ अधिकारी व ३४८ अमंलदार सहभागी झाले होते.कलम१२२ मपोका प्रमाणे एकूण नऊ कारवाया, भारतीय शस्त्र कायद्याप्रमाणे एकूण नऊ गुन्हे दाखल, कलम ३३ आर डब्ल्यू मपोका प्रमाणे एकूण आठ कारवाया, कलम ११०, ११७ मपोका प्रमाणे ४४ कारवाया, कलम १०२, ११७ मपोका प्रमाणे दोन कारवाई,१६५ समन्स बजावले.

४४ जमानती वॉरंट बजावले, २७ पकड वारंटची तामिल केली.महाराष्ट्र दारुबंदी अधिनियमानुसार एकूण १९ कारवाई,जुगार अधिनियमानुसार एक कारवाई,नाकाबंदीदरम्यान एकूण ५८९ वाहनांची तपासणी, १३२ जणांवर कारवाई करून ५९ हजार ६०० रुपय दंड आकारला, अभिलेखावरील ७७ गुन्हेगारांना चेक करण्यात आले. अकोट फैल पोलिसमध्ये दाखल गुन्ह्यातील फरार आरोपी राहुल मोहन रंधवे (२३, रा. रामदासमठ) यास अटक करण्यात आली.