ताज्या बातम्या

अमित शहा येणार म्हणताच पोलिसांनी कडूंना हाकलले

अमरावती – अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजपा उमेदवार नवनीत राणा यांच्या विरोधात प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांच्यासह सर्वचजण एकवटले आहेत. यामुळे या निवडणुकीला विशेष महत्त्व आले आहे. 26 एप्रिल रोजी येथे मतदान असून उद्या प्रचाराचा अखेरचा दिवस आहे. उद्या येथील सायन्स कोर मैदानात बच्चू कडू यांची महत्त्वपूर्ण सभा होणार होती. त्यासाठी त्यांना रितसर परवानगीही देण्यात आली होती. मात्र अमित शहा यांना उद्या याच मैदानावर सभा घ्यायची असल्याने पोलिसांनी सरळ कायदा धाब्यावर बसवून बच्चू कडू यांना मैदानातून हाकलून दिले. यामुळे संतापाची लाट उसळली आहे.

अमरावतीच्या सायन्स कोर मैदानात 20 आणि 21 एप्रिल असे दोन दिवस भाजपाने सभेसाठी परवानगी घेतली होती. ही परवानगी त्यांना पोलिसांकडून देण्यात आली होती. त्यानंतर 23 व 24 एप्रिल असे दोन दिवस याच मैदानावर सभा घेण्याची परवानगी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांना त्याच पोलिसांनी दिली. या परवानगीसाठी 5, 7, 12 एप्रिल अशा तीन दिवशी बच्चू कडू यांनी रितसर अर्ज केला होता. 18 एप्रिल रोजी त्यांना या मैदानावर सभा घेण्याची परवानगी देण्यात आली. त्यासाठी आवश्यक ती रक्कम बच्चू कडू यांनी भरल्यानंतर त्यांना 23 व 24 एप्रिल असे दोन दिवस मैदान त्यांच्यासाठी आरक्षित असल्याची रितसर पावती देण्यात आली. मात्र त्यानंतर धक्कादायक घटना घडल्या. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे नेते अमित शहा यांना अमरावतीत याच मैदानावर 24 एप्रिललाच सभा घेण्यास वेळ होता.

हे ठरल्यानंतर पोलिसांनी सरळ बच्चू कडू यांना परवानगी नाकारली. आज 24 एप्रिलच्या सभेच्या तयारीसाठी बच्चू कडू हे आपल्या कार्यकर्त्यांसह मैदानात हजर झाले तेव्हा वरिष्ठ पोलीस अधिकारी गणेश शिंदे यांनी या सर्वांना अडवले आणि मैदान सोडून जाण्यास सांगितले. बच्चू कडू यांनी परवानगीची पावती दाखवल्यानंतरही काही फरक पडला नाही. त्यातच अमित शहा आणि भाजपा यांच्याकडून 24 एप्रिलच्या सभेसाठी कोणतीही लेखी परवानगी घेण्यात आलेली नाही. पोलीस अधिकारी गणेश शिंदे यांच्याकडे अमित शहांना सभेसाठी परवानगी दिल्याचे लेखी कागदपत्र मागितल्यावर ते कोणतेही कागदपत्र देऊ शकले नाहीत, असे असूनही ज्याला रितसर परवानगी देण्यात आली होती त्या बच्चू कडू यांना मैदानातून हाकलवून देऊन त्या मैदानावर भाजपाच्या उद्याच्या सभेसाठी 35 हजार लोकांना बसता येईल असा भव्य मंडप उभारण्याचे काम बिनधास्तपणे सुरू होते. विशेष म्हणजे बच्चू कडू यांच्यावर कारवाई केल्यानंतर अचानक जोराचा वारा सुटला आणि भाजपाच्या सभेसाठी उभारलेला मंडप खाली कोसळला. हनुमानानेच अद्दल घडवली अशी चर्चा यानंतर अमरावतीत सुरू झाली.