Peace of Mind
ताज्या बातम्या संपादकीय

शांतता

(महाकोठ्ठीत)

हे काही अचानक घडले नाही आहे. काय झालं ते काय कळत आहे का ? काहीही न करता हे मात्र शक्य नाही…. नेमकं काय केलं हे मात्र निश्चितपणे सांगता येत नाही.अशी ही अवस्था.ही इथे या ठिकाणी निर्माण झालेली प्रचंडावस्था आहे. ज्याच्यामध्ये ही स्फुरलेली आहे, त्याच्यामध्ये अनेक प्रकारची विश्वं विविध प्रकारच्या पातळीवर वावरताना दिसतात.

हे मी माझ्या बद्दलच बोलतोय असे नाही. पण स्वप्न असते प्रत्येकाचे वर जाण्याचे! स्वप्न म्हणजे ईच्छा असते. अपेक्षा असते, महत्वाकांक्षा असते, वर गेले पाहिजे, वर जाता आले पाहिजे, वर जाता येऊ शकते का? वर जाता येणे शक्य आहे का?……. ते शक्य असल्याशिवाय का इतकी प्रारुपे दृश्यमान स्वरूपात दिसतात! ही प्रारूपे आहेत तरी कशाची?.. ही प्रारूपे आहेत मार्गांची.

वर जाणे शक्य आहे….. जिथून वर जायचे आहे. तिथे आपण किती काळ होतो.याचे ज्ञान असणे किंवा ते ज्ञान नसणे याचा वर जाण्याच्या या प्रयत्नांना काहीही मागमूस असावा हे काही अत्यावश्यक नाही.मन शांत झालं की वर जाता येते. हे मनाच्या शांततेचं शांत होणं सरेआम जसं आपल्याला वाटतं तसं साधंसुधं नाही.ते उपशांत होणे आहे. उपशांत होणे हे गंभीरपणा सशक्त होऊन सर्वतोपरीने साधा – सरळ आणि सर्वतोमुखी होतो तेव्हा ते अस्सल अर्थ धारण करणे असे होते. हे चांगल्याप्रकारे लक्षात घेतले पाहिजे.

आता, तो वर जातो. त्याचे हे वर जाणे त्याने आधीच ठरवलेले होते.त्याला नेमके कुठे जायचे आहे हे निश्चित चित्र काढता येत नसते.ते चित्र अस्तित्वातच नसते.जेव्हा तो वर जातो तेव्हा तिथे गेल्यावर त्याला ती भूमी दिसते.तो ती भूमी जाणतो तेव्हा ही भूमी मला आधीपासूनच ठाऊक होती असे त्याच्या लक्षात येते आणि त्याच्या आनंदाचा विस्तार होत जातो.त्या भूमीत आल्यानंतर त्याचं बोलणं निश्चित शहाणपणाचं होतं.त्याचं ते भाषणच होतं. त्याला मन्तभाणी असे म्हटले आहे.त्याचं ते जे भाषण होतं ते इतकं शहाणपणाचं , इतकं प्रज्ञामय आणि लोभस की ते पाहाणाऱ्या ऐकणाऱ्याला ऐकत-पाहात रहावस वाटावं.असं असतं ते.

त्यात उध्दटपणाच्या अक्षराचा गंधही नसतो.
त्यांचं भाषण आता अनुद्धट झालं आहे.

पण तो माणूसच आहे.माणूस आहे म्हणून अनेक प्रसंग येतात.जेव्हा माणुसकीला लांछन लावणाऱ्या काही कृती पाहण्याचे प्रसंग जर येत असतील तर त्या प्रसंगांना सामोरे जाता येते.तिथे जाऊन आपल्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा विकार जर आला असेलच तर त्याला तो धुनकतो. गादीवर काठ्या मारून मारून त्या गादीतला रू एक प्रकारे झटकून काढतो. रू कापूस असताना कापूस पिंजून काढतो. त्यातला रु आणि सरकी वेगवेगळी करतो असे करणाऱ्या त्या पिंजाऱ्यासारखा हा माणूस. तो विकारी आचरण खल्लास करतो आणि अस्सल वर्तन जे नितळ मनाने कार्यान्वित झाले आहे ते कायम ठेवतो.

ते असेही सांगता येईल. ज्याप्रमाणे एखाद्या झाडाच्या वाळलेल्या पानाला हवेची एखादी झुळूक जरी आली तरी ती झर्रकन उडवून नेते. त्याप्रमाणे तो विकाराला उडवून लावतो.हे तो कसे करतो ? तो करतो.ते आता त्याच्या हातातच असते.आता त्याला दुसऱ्या कोणत्याही साधनाची गरज भासत नाही.स्वतःच्या मनात निर्माण झालेल्या कोणत्याही प्रकारच्या विचाराला तो स्वतः ठरवू शकतो.विचार कशाबद्दल आहे? रागाचा आहे. मोहाचा आहे. द्वेषाचा आहे. की प्रेमाचा आहे. बांधिलकीचा आहे.बंधुभावाचा आहे.एवढंच नाही, तो त्यावर प्रक्रिया करू शकतो. रागाचा असेल तर तो त्याला चिमटीत पकडून ठेवतो.

मोहाचा ,द्वेषाचा असेल तर त्या वाळलेल्या पानासारखा भिरकावून देतो त्याला.जर प्रेमाचा असेल.बांधिलकीचा असेल.बंधुभावाचा असेल.तर त्याची तो जोपासना करतो.वाढ करतो.या परिवर्तनाच्या पातळ्या अत्यंत तरलतेने त्याच्या बोलण्यात येतात.

त्याच्या मन्तभाषणात येतात. त्याच्या गंभीरपणाने त्याची जी शांतता झालेली दिसते आहे, ती शांतता जो गंभीरपणा धारण करते आहे तो हा गंभीरपणा काही साधासुधा नसतो.तो जो अत्यंत प्रयत्न करत आहे त्यातून त्याला प्राप्त झालेला हा स्वभाव आहे .

तो आता हे जाणतो की मी आता वर आलेला आहे.मी आता अशा भूमीत आलेला आहे की ज्या भूमीतून मी कोणत्याही विकाराकडे पाहू शकतो. विचारांकडे पाहू शकतो.त्या विचारांना विकार असेल तर विकार.विचार असेल तर विचार जे काय असेल असे त्यांना ओळखू शकतो.आणि जर मी हे ओळखू शकत असेल, त्यांना नाव देऊ शकत असेल तर नाम आणि त्याचं रूप एकच आहे मी जाणणारा असल्यामुळे मला त्याच्यावर प्रक्रिया करता येते.

जर मला या विचारांवरच प्रक्रिया करता येत असेल तर मला त्या विचारांमध्ये अडकून पडण्याची काय आवश्यकता ऊरत नाही. त्या विचारांमध्ये लिप्त होणं अशक्य ठरतं.ते विचार म्हणजे मी असा होत नाही तर माझ्यामध्ये ते उत्पन्न झालेले विचार आहे आणि ते विचार मी वाढवू शकतो किंवा मी ते विचार काढून टाकू शकतो म्हणून माझ्यामध्ये मी अशा प्रकारची एक अवस्था निर्माण झालेली स्वतःच पाहू शकतो.

माझ्यामध्ये निर्माण झालेले हे विचार जर मी स्वतः पाहू शकत असेल तर मी इतरांच्या विचारांकडे सुद्धा पाहू शकतो.माझ्या विचारांमध्ये जर मी पाहू शकतो तर माझ्या मनामध्ये काहीही कोणत्याही प्रकारचं विचार म्हणून उरलेलं नाही.ते शून्य झालेलं आहे. मी एकही माझ्या सानिध्यात येत असतील तर त्यांना त्यांच्या विचारांसह पाहू शकतो. त्यांच्या विचारासह जर मला पाहता येत असेल तर त्यांच्यामध्ये प्रेम उत्पन्न करणं हे मला सहज शक्य आहे.

त्यांना माणुसकी प्रणित जीवन काय आहे हे सांगता येईल. सहज शक्य आहे ते. विचारातूनच माणूस बनतो. हे सगळ्या प्रयत्नांतून बघणे शक्य झालेले आहे. त्या माणसांमध्ये कोणता विचार उत्पन्न करावा हे मी माझ्या हातात ठेवले आहे. मी त्याच्या मध्ये कोणताही विचार उत्पन्न होऊ देऊ शकतो. मी शांत झालो. मी, वर्ग, माझी भाषा, बदल्यांच वर्तुळ पूर्ण झालेलं आहे.

संजय प्रल्हादराव डोंगरे.
9420704580