महाराष्ट्र

परभणीला विकासाचे मॉडेल बनवणार

परभणी – परभणी शहरासह सर्वच तालुके व ग्रामीण भागात रस्ते, पाणी, वीज या समस्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे. जिल्ह्यात उद्योगधंदे नसल्याने तरुणांना रोजगारासाठी मोठ्या शहरांत जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर परभणी महानगरपालिकेत समाविष्ट गावात डीपीआरनुसार पाणी, रस्ते, गटार, वीज पथदिवे अशा मूलभूत सुविधा प्राधान्याने उपलब्ध करून देणार आहे. परभणी, पाथरी, सेलू, जिंतूर, मानवत, सोनपेठ, गंगाखेड, पालम, पूर्णा यासह जालना जिल्ह्यातील मतदारसंघ असलेल्या मंठा, परतूर, अंबड, घनसावंगी या शहरी भागांचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी नव्याने विकास आराखडा तयार करण्यात येईल.
विशेष म्हणजे परभणीतील कृषि विद्यापीठाची हजारो एकर जमीन सिंचनाखाली आणून त्यातून बियाणेनिर्मिती करून ते बियाणे शेतक-यांना मोफत वाटप करण्यात येईल. परभणीचा लोकप्रतिनिधी या नात्याने १० हजार कोटी रुपये निधी मंजूर करून परभणी लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचा संकल्प महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांनी आपल्या जाहीरनाम्याद्वारे केला आहे.

जानकर यांनी जाहीरनाम्यात रेल्वे आणि संरक्षण क्षेत्रातील साहित्य निर्मितीसाठीचे १ युनिट मंजूर करून त्याद्वारे सुरू झालेल्या जोडधंद्यातून ५ हजार लोकांना काम मिळेल यासाठी रेल्वेची पूर्णा येथे जागाही उपलब्ध आहे. याशिवाय सर्व तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी मुबलक पाणी, वीज, प्रशस्त पार्किंग, भूमिगत गटारे, स्वच्छतागृह, विश्रामगृह आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी उद्योगांसाठी पोषक वातावरण तयार करून त्या भागात औद्योगिक वसाहत उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. घनसावंगी तालुक्यात मोसंबी बागायतदार मोठ्या प्रमाणात असून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेण्यात येईल. परतूर विधानसभा मतदारसंघातील औद्योगिक मागासलेपणा तसेच सिंचन व रोजगाराच्या समस्या दूर करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील. जिंतूर, येलदरी धरणावरील उजवा कालवा व घनसावंगी येथे गोदावरी नदीतून पाणी लिफ्ट करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. याशिवाय परभणी येथे पेट्रोलियम डेपोची निर्मिती, जिल्हा दूध संघ निर्मितीसाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे महायुतीचे जानकर यांनी जाहीरनाम्यात म्हटले आहे.

मानवतरोड-सोनपेठ-परळी वैजनाथ या नवीन रेल्वेमार्गाला मंजुरी मिळालेली आहे. तसेच पालम तालुक्यातील जांभूळबेट पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी सर्वतोपरी विकास कामे करण्यात येतील. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ऊस उत्पादन घेतले जाते. या पार्श्वभूमीवर गूळ उद्योगाला चालना मिळावी म्हणून बाजारपेठ निर्मितीचे प्रयत्न करण्यात येतील. सद्यस्थितीत गंगाखेड विधानसभा रासपचे विकास मॉडेल ठरत आहे. याच धर्तीवर परभणी लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांत विकासाचे मॉडेल करण्यासाठी कृतिशील अंमलबजावणी करणार असल्याचे महायुतीचे उमेदवार जानकर यांनी आपल्या जाहीरनाम्यातून प्रसिद्ध केले आहे.