महाराष्ट्र

महानिर्मितीकडे १५ दिवस पुरेल एवढाच कोळसा

नागपूर : राज्यात विजेची मागणी वाढत असतानाच वीज निर्मितीही वाढली आहे. परंतु, महानिर्मितीकडे केवळ १५ दिवस पुरेल एवढाच कोळसा साठा शिल्लक आहे. महानिर्मितीची स्थापित वीजनिर्मिती क्षमता १३ हजार १५२ मेगावॉट आहे. त्यामध्ये कोळसा आधारित औष्णिक विजेचा वाटा ९ हजार ५४० मेगावॉटच्या जवळपास आहे. कंपनीच्या औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पातून सध्या रोज सरासरी ७ ते ८ हजार मेगावॉट वीजनिर्मिती होत आहे. दरम्यान, राज्यात विजेची मागणी वाढत असतानाच केवळ १५ दिवसांच्या कोळसा साठ्यामुळे चिंता वाढली आहे.

महानिर्मितीकडे १७ एप्रिल २०२४ रोजी २१ लाख ३० हजार ५४७ मेट्रिक टन कोळसा (१५ दिवस) होता. अधिक वीज मागणीमध्ये हा साठा किमान २२ दिवसांचा असावा असा केंद्रीय ऊर्जा आयोगाचा निकष आहे. परंतु त्याहून कमी साठा आहे. गेल्यावर्षी १७ एप्रिल २०२३ रोजी महानिर्मितीकडे १७ लाख १४ हजार ९३४ मेट्रिक टन (१२ दिवस) कोळसा साठा होता. त्यात कोराडी प्रकल्पातील २३ दिवस, खापरखेडा २२ दिवस, चंद्रपूर प्रकल्पातील १६ दिवसांच्या साठ्याचा समावेश होता. परंतु नाशिक प्रकल्पात दीड दिवस, भुसावळ दीड दिवस, पारस २ दिवस, परळी ३ दिवस पुरेल एवढा साठा होता. त्यामुळे धोकादायक स्थिती होती. परंतु आता एप्रिल २०२४ मध्ये चंद्रपूरमध्ये १४ दिवस, कोराडी २५ दिवस, खापरखेडा १० दिवस, नाशिक ८ दिवस, भुसावळ २४ दिवस, पारस १५ दिवस, परळी १५ दिवस पुरेल एवढा साठा आहे. त्यामुळे गेल्यावर्षीहून स्थिती सुधारली आहे.

राज्यात पावसाळ्यात महानिर्मितीला रोज सुमारे ८० हजार मेट्रिक टन कोळसा लागतो. परंतु एप्रिल- मे महिन्यामध्ये विजेचा वापर वाढत असल्याने महानिर्मितीला निर्मिती वाढवावी लागते. सध्या वीज निर्मिती वाढल्याने महानिर्मितीला पूर्ण क्षमतेने संच चालवावे लागत आहेत. त्यामुळे रोज १ लाख ३० हजार मेट्रिक टन कोळसा लागत आहे.

राज्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून विजेची मागणी सतत २८ ते २९ हजार मेगावाॅटच्या जवळपास आहे. त्यातील २४ ते २५ हजार मेगावाॅटची मागणी महावितरणची आहे. मुंबईत साडेतीन ते चार हजार मेगावाॅट मागणी आहे. ही मागणी राज्यात २५ मार्चला २४ ते २५ हजार मेगावाॅटच्या जवळपास होती. त्यातील महावितरणची मागणी २१ हजार ४९४ मेगावाॅट तर मुंबईची मागणी तीन हजार मेगावाॅटच्या जवळपास होती.