क्राईम

पोलिस कोठडीत मांसाहारी ‘पाहुणचार’

नाशिक : विविध स्वरूपाच्या गुन्ह्यांत अटक केलेल्या संशयितांना पोलिस कोठडीत असताना मिळणा-या डब्यात आता मांसाहाराचाही समावेश करण्यात आला आहे. संशयितांच्या मागणीनुसार नव्हे, तर पुरवठादाराला सूचित केलेल्या दिवसांनुसार ठराविक वेळेस मांसाहाराचा ‘पाहुणचार’ देण्यात येत आहे. सर्व भाज्या व डाळींचा डब्यात वापर करून आजारी असलेल्या संशयितांना दूध पुरविण्याचे निर्देशही आयुक्तालयाने दिले आहेत. या तरतुदींनुसार संबंधित कंत्राटदाराने संशयितांना डबा देण्यास प्रारंभ केल्याचेही सूत्रांनी सांगितले. पोलिस आयुक्तालयाच्या तेरा पोलिस ठाण्यांत दाखल विविध गुन्ह्यातील संशयितांना पोलिस कोठडीदरम्यान पोलिस ठाण्यातील तुरुंगात ठेवण्यात येते. सरकारवाडा, पंचवटी, आडगाव, सातपूर, मुंबई नाका, भद्रकाली, गंगापूर, इंदिरानगर, म्हसरूळ व अंबड या पोलिस ठाण्यांतील तुरुंगांत संशयित असतात.
त्यावेळी संशयितांना कैदीभत्ता पुरविण्यासाठी सिडकोतील व्यक्तीला आयुक्तालयाने कंत्राट दिले आहे. ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत अटी-शर्तींनुसार संबंधित ठेकेदाराला पोलिस ठाण्यातील संशयितांना जेवण पुरवावे लागेल. दोन्ही वेळेच्या एका डब्याकरिता ७८ रुपये प्रतिदिन सर्व करांसह असा दर आयुक्तालयाने निश्चित केलेला आहे. डब्यात सर्व प्रकारच्या भाज्यांचा आणि वरणाकरिता सर्व प्रकारच्या डाळींचा आलटून पालटून वापर करावा. ज्यावेळी संशयिताला मांसाहारी डबा पुरविण्यात येईल, त्यावेळी वरण आणि इतर भाजी न देण्याची सूचनाही आयुक्तालयाने केली आहे.