महाराष्ट्र

नवजात मृत्यूदराचेही प्रमाण झाले कमी

पुणे – गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रातील बालमृत्यूच्या दरात लक्षणीय घट झाल्याचे निदर्शनास आले आहे. विविध संस्थांनी केलेल्या सर्वेक्षण व अहवालानुसार, २०१८ मध्ये राज्याचा बालमृत्यू दर हा प्रति एक हजार २२ इतका होता, आता तो १८ वर आला आहे. तर, नवजात मृत्यूदर हा प्रति एक हजार १३ इतका होता, तो आता ११ पर्यंत कमी झाला.

संयुक्त राष्ट्राच्या शाश्वत विकास ध्येयानुसार, सन २०३० पर्यंत नवजात मृत्यू दर १२ पेक्षा कमी करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले होते. महाराष्ट्रात हे उद्दिष्ट २०२० मध्ये गाठण्यात यश प्राप्त झाले. राज्यात माता व बाल आरोग्य संबंधित जनजागृतीमुळे आणि जनतेमध्ये वाढत असलेल्या जागरुकतेमुळे बालमृत्यूचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून येत आहे. शिवाय गर्भवती आणि बालकांसाठी नोव्हेंबर विविध पातळीवर करण्यात आलेल्या संयुक्त प्रयत्नांचेही हे यश असल्याचे दिसून येते.

नवजात बालमृत्यू कमी करण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ५३ विशेष नवजात शिशू काळजी कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. यामार्फत दरवर्षी अंदाजे ५० ते ६० हजार आजारी नवजात शिशू तसेच कमी वजनाच्या बालकांवर उपचार केले जातात. कक्षामध्ये ‘कांगारू मदर केअर’ पद्धतीचा वापर करण्यात येतो व उपचार करण्यात येतात. या उपक्रमाचा फायदा बालमृत्यू कमी होण्यासाठी झाला.