आंतरराष्ट्रीय

मस्क यांनी भारत दौरा अचानक पुढे ढकलला

मुंबई – टेस्ला आणि स्पेसएक्स या जगप्रसिद्ध कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी इलॉन मस्क यांनी २१ आणि २२ एप्रिल रोजी होणारा आपला भारत दौरा अचानक पुढे ढकलला आहे. हा दौरा पुढे ढकलण्यामागचे कारण समजू स्पष्ट झालेले नाही. परंतु टेस्लाच्या पहिल्या तिमाहीशी संबंधित कामगिरीशी संबंधित प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी कॉन्फरन्स कॉलमध्ये उपस्थित राहण्यासाठी मस्क यांनी हा दौरा पुढे ढकलल्याचे सांगण्यात येत आहे. मस्क यांचा बहुचर्चित भारत दौरा खूप महत्त्वाचा मानला जात होता. मस्क पहिल्यांदाच भारतात येत होते. या दौऱ्यादरम्यान मस्क हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार होते. १० एप्रिल रोजी इलॉन मस्क यांनी स्वत: भारत दौऱ्याची माहिती दिली होती होती. मोदी यांच्या भेटीनंतर ते भारतातील बाजार प्रवेशाबाबत मोठी घोषणा करण्याची शक्यता होती. मस्क यांनी नुकतेच संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेतील भारताच्या स्थायी सदस्यत्वाचे समर्थन केले आहे. मस्क यांची टेस्ला कंपनी ईलेक्ट्रिक आणि ड्रायव्हरलेस कार निर्मिती करते. भारताने ईलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याचे धोरण राबवले आहे. या धोरणाचा भाग म्हणून भारत सरकारने मेक इन इंडिया अंतर्गत इलेक्ट्रिक कार कंपन्यांना टॅक्समधून दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. या क्षेत्रात इलॉन मस्क भारतात २० ते ३० अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार असल्याचे सांगितले जात आहे. पंतप्रधान मोदी यांच्या भेटीनंतर ही घोषणा होण्याची दाट शक्यता होती. पण, मस्क यांचा दौरा रद्द झाल्याने ही घोषणाही बारगळली आहे.