मुंबई दि. 12- मीस क्वीन ऑफ द वर्ल्ड (इंडिया) ची विजेती अबोली कांबळे यांनी आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांची बांद्रा येथील कार्यालयात सदिच्छा भेट घेतली. मीस क्वीन ऑफ द वर्ल्ड (इंडिया) ही महत्वाची सौंदर्य स्पर्धा नुकतीच दिल्ली येथे पार पडली.
या स्पर्धेत परभणी मधील दलित युवती अबोली कांबळे हिने प्रथम क्रमांक पटकावला. येत्या एप्रिल महिन्यात अमेरिकेतील न्युयॉर्क येथे मीस क्वीन ऑफ द वर्ल्ड ची जागतिक सौंदर्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
या महत्वपूर्ण आणि प्रतिष्ठेच्या जागतिक सौंदर्य स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी भारतीय सौंदर्यवती म्हणून अबोली कांबळे हिची निवड करण्यात आली आहे. अबोली कांबळे ही दलित युवती जागतिक सौंदर्य स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करुन विश्वसुंदरी कीताब जिंकेल अशा शुभेच्छा यावेळी ना.रामदास आठवले यांनी अबोली कांबळे यांना दिल्या.
सौंदर्य स्पर्धेत दलित युवती सुध्दा अग्रेसर आहेत. मीस क्वीन ऑफ द वर्ल्ड (इंडिया) चा किताब जिंकल्याबद्दल अबोली कांबळेचा आम्हाला अभिमान आहे असे यावेळी ना.रामदास आठवले म्हणाले.
मीस क्वीन ऑफ द वर्ल्ड या जागतिक स्पर्धेसाठी जगभरातील सर्व देशात एक एक प्रतिनिधीची निवड केली जात आहे. त्यासाठी भारतात मीस क्वीन ऑफ द वर्ल्ड (इंडिया) म्हणून अबोली कांबळे या सौंदर्यवतीची निवड झाली आहे. तिच्या पुढील वाटचालीला ना. रामदास आठवले यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
अबोली कांबळे सध्या रशियात वैद्यकीय शिक्षण घेत आहे. तसेच मुंबईत वडिलांच्या फार्मा कंपनीचा व्यवसाय सांभाळत आहे. या भेटीवेळी रिपाइंचे मातंग आघाडीचे तुषार कांबळे उपस्थित होते.