देश

हेलिकॉप्टरमध्ये बसताना ममता बॅनर्जी पाय अडकून पडल्या

कोलकाता – निवडणूक प्रचारसभेहून परताना ममता बॅनर्जी पाय अडकून पडल्यामुळे जखमी झाल्या. पश्चिम बंगालच्या बर्धमानमधील दुर्गापूर येथे हेलिकॉप्टरमध्ये बसताना ही घटना घडली. यासंदर्भातील व्हिडीओ व्हायरल झालाय. गेल्या महिन्यात देखील त्या बाथरुममध्ये पडल्याने त्यांच्या डोक्याला इजा झाली होती.

दुर्गापूर येथील प्रचार संपवून ममता बॅनर्जी कारने हेलिपॅडकडे आल्या. शिडीवरून हेलिकॉप्टरमध्ये चढताना हेलिकॉप्टरच्या गेटवर त्यांचा पाय घसरून त्यांचा तोल गेला. मुख्यमंत्री पडल्याचे दिसताच सुरक्षा रक्षकांनी त्यांना सावरले. ममता यांना हलका मार लागला आहे. दुर्गापूरहून त्या आसनसोलला रवाना झाल्या आहेत.

गेल्या 14 मार्च रोजी त्या त्यांच्या निवासस्थानी पडल्या होत्या. जानेवारीमध्येही त्यांच्या डोक्याला मार लागला होता. बर्धमानहून कोलकात्याला येत असताना मुसळधार पावसात त्यांच्या कार चालकाने अचानक ब्रेक लावला होता. यामुळे ममतांचे डोके आदळले होते. यापूर्वी जून 2023 मध्येही विदेश दौऱ्यावर असताना त्यांच्या गुढघ्याला मार लागला होता. त्यापूर्वी 2023 च्या सुरुवातीला हेलिक़ॉप्टरमधून उतरताना त्या जखमी झाल्या होत्या.