राजकीय

महायुतीतील जागावाटपाचा तिढा अद्यापही सुटेना

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीतील जागावाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. मुख्यमंत्री शिंदे यांचा गट आणि राष्ट्रवादीतील अजित पवार गट जास्त जागा मिळाव्यात म्हणून आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. दुसर्‍या बाजूला राज ठाकरे यांची मनसेही महायुतीत सहभागी होणार असल्याने जागावाटपाचे गणित आणखी अवघड बनले आहे. याबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी आणि उमेदवार निश्चित करण्यासाठी महायुतीच्या नेत्यांचे आज दिल्लीत जोरदार बैठक-सत्र सुरू आहे. या बैठकांतून चर्चा झाल्यानंतरच महायुतीच्या उमेदवारांची यादी एक-दोन दिवसांत जाहीर होण्याची शक्यता आहे.

दिल्लीत आज भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होती. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या बैठकीनंतर भाजपाची महाराष्ट्रातील दुसरी यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यानंतर महायुतीतील जागावाटपासंदर्भात महत्त्वाची बैठक दिल्लीत होणार आहे. दिल्लीत ही बैठक होणार असल्याचे अनेक दिवसांपासून सांगितले जात होते. आता ही बैठक ठरली असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत होणार्‍या या बैठकीला देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहणार आहेत. या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार रात्री 8 वाजता दिल्लीला रवाना झाले. या बैठकीत अंतिम जागावाटप आणि महायुतीत मनसेचा समावेश इत्यादीबाबत निर्णय होईल.

जागावाटपात राष्ट्रवादीने नऊ जागांसाठी आग्रह धरला असला तरी चार जागांपेक्षा अधिक जागा मिळण्याची शक्यता नाही. मुख्यमंत्री शिंदे यांनी विद्यमान खासदारांच्या 13 जागा मिळाव्यात अशी मागणी केली आहे. याबरोबरच मुख्यमंत्र्यांना ठाण्याची जागा हवी आहे. दोन्ही मित्रपक्षांकडून जास्त जागांची मागणी झाल्याने महायुतीतील तिढा कायम आहे. त्यात आता मनसेचाही महायुतीत समावेश होणार आहे. त्यामुळे मनसेसाठीही एक किंवा दोन जागा सोडाव्या लागणार आहेत. मनसेला एक वा दोन जागा द्यायच्या तर त्या कोणत्या, या संदर्भातला निर्णय दिल्लीत होणार्‍या बैठकीत होण्याची शक्यता आहे. काँग्रेस आणि शिवसेनेला किती जागा सोडायच्या याचाही अंतिम निर्णय बैठकीत होणार आहे. या बैठकीत मतदारसंघाचे जागावाटप अंतिम झाले की, सोमवारी संध्याकाळी किंवा मंगळवारी उमेदवार जाहीर केले जातील, असे म्हटले जात आहे.