ताज्या बातम्या

महाराष्ट्रात तीन वाजेपर्यंत सर्वात कमी मतदानाची नोंद

अमरावती – महाराष्ट्राची पुरोगामी अशी ख्याती आहे. पण या पुरोगामी महाराष्ट्रात यंदा सर्वात कमी मतदान होताना दिसत आहे. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. महाराष्ट्रतील एकूण 8 मतदारसंघांमध्ये हे मतदान पार पडत आहे. या मतदारसंघांमघ्ये महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून जोरदार प्रचार करण्यात आला. पण फक्त नेतेमंडळी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांपुरताच हा मतदानाचा उत्साह बघायला मिळतोय. कारण बहुतेक नागरिकांनी मतदानाकडे पाठ फिरवली आहे. प्रत्येक नागरीकाने मतदानाचा हक्क बजवायला हवा, तो त्याचा अधिकार आहे. पण आता नागरीक मतदानाकडे कानाडोळा करताना दिसत आहे. महाराष्ट्रात आज पार पडत असलेल्या मतदानाची आकडेवारी धक्कादायक आहे. कारण संपूर्ण देशात इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात दुपारी 3 वाजेपर्यंत सर्वात कमी टक्के मतदान झालं आहे. त्यामुळे नागरिकांच्या मनात नेमकं काय आहे? असा प्रश्न निर्माण होतोय.

महाराष्ट्रात दुपारी 3 वाजेपर्यंत केवळ 43.01 टक्के मतदान झालं आहे. परभणी लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदान झालं आहे. परभणीत 44.49 टक्के मतदान झालं आहे. अकोल्यात 42.69 टक्के मतदान झालं आहे. वर्धा मतदारसंघात 45.95 टक्के मतदान झालं आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघात 43.76 टक्के मतदान झालं आहे. तर बुलढाण्यात 41.66 टक्के मतदान पार पडलं आहे. हिंगोलीत 40.50 टक्के मतदान झालं आहे. तसेच नांदेडमध्ये 42.42 टक्के मतदान झालं आहे. यवतमाळ-वाशिममध्ये 42.55 टक्के मतदान झालंय. देशात सर्वाधिक मतदान हे त्रिपुरा राज्यात झालं आहे. त्रिपुरा राज्यात 68.92 टक्के मतदान झालं आहे.

देशात इतर राज्यांमध्ये किती टक्के मतदान?
देशात 13 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकूण 88 लोकसभा मतदारसंघांमध्ये आज मतदान पार पडत आहे. केरळमध्ये 20, कर्नाटकमध्ये 14, राजस्थानमध्ये 13, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात प्रत्येकी 8 जागा, मध्य प्रदेशात 6, आसाम आणि बिहारमध्ये प्रत्येकी 5, पश्चिम बंगाल आणि छत्तीसगडमध्ये प्रत्येकी 3, त्रिपुरामध्ये 1 आणि जम्मू-काश्मीरमध्ये 2 जागांवर मतदान पार पडत आहे. देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये झालेल्या मतदानाची दुपारी 3 वाजेपर्यंतची आकडेवारी समोर आली आहे. त्रिपुरामध्ये सर्वाधिक 68.92 टक्के मतदान झालं आहे. तर आसाममध्ये 60.32 टक्के, बिहारमध्ये 44.24 टक्के, छत्तीसगडमध्ये 63.92 टक्के, जम्मू-काश्मीरमध्ये 57.76 टक्के, कर्नाटकमध्ये 50.93 टक्के, केरळमध्ये 51.64 टक्के, मध्य प्रदेशात 46.50 टक्के, राजस्थानात 50.27 टक्के, पश्चिम बंगालमध्ये 60.60 टक्के आणि महाराष्ट्रात 43.01 टक्के मतदान झालं आहे.