देश

तब्ब्ल २३८ वेळा निवडणूक हरलेला ’इलेक्शन किंग’ 

चेन्नई- तामिळनाडूतील धर्मापुरी लोकसभा मतदारसंघात एक असा अपक्ष उमेदवार उभा आहे की ज्याने आतापर्यंत तब्बल २३८ वेळा निवडणूक लढविली आहे.या सर्व निवडणुकांत त्याचा पराभव झाला आहे.के.पद्मराजन असे या उमेदवाराचे नाव असून ते ’इलेक्शन किंग’ म्हणजेच निवडणूक राजा म्हणून प्रसिद्ध आहेत. पद्मराजन यांनी आतापर्यंत ग्रामपंचायत ते राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणुका लढविल्या आहेत.आतापर्यंत त्यांनी सगळ्या मिळून २३८ निवडणुका लढविल्या आहेत. यात जनतेने त्यांना काम करण्याची एकदाही संधी दिलेली नाही. सर्वांत अयशस्वी उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्‌स’, ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्‌स’मध्ये नोंद आहे.

६५ वर्षांच्या के. पद्मराजन यांचे तामिळनाडूतील सालेम येथे टायर दुरुस्तीचे दुकान आहे. राज्यघटनेने निवडणूक लढविण्याबाबत आपल्याला दिलेल्या अधिकाराचा वापर करायला हवा, असे त्यांना वाटते. मला हरायचेच आहे. जिंकल्याचा आनंद क्षणिक असतो,पराभवाची आठवण कायम राहते,असा तर्क ते लावत असतात.निवडणूक लढविण्यासाठी त्यांनी आतापर्यंत एक कोटींहून अधिक रुपये खर्च केले आहेत.त्यांनी आतापर्यंत अटलबिहारी वाजपेयी,पी. व्ही.नरसिंह राव, जे. जयललिता, एम. करुणानिधी, ए.के.अँटनी, बी.एस.येडियुराप्पा, सदानंद गौडा यांच्याविरोधात निवडणुका लढविल्या आहेत. यंदाही त्यांनी धर्मापुरी येथून लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला आहे.