ताज्या बातम्या

पंतप्रधान मोदींकडून महाराष्ट्रदिनाच्या मराठीत शुभेच्छा

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ६५ व्या महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्रातील जनतेला मराठीतून शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्र दिनाप्रमाणेच आज गुजरात राज्याचाही स्थापना दिवस आहे. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या एक्स अकाऊंटवरून महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पोस्टमध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्र दिन म्हणजे या भूमीचा वैभवशाली वारसा आणि अदम्य भावना यांचा गौरव करण्याचा दिवस आहे ज्या भूमीने महान दूरदर्शी घडवले आहेत आणि हा दिवस या राज्याच्या सांस्कृतिक समृद्धीशी संबंधित आहे. परंपरा, प्रगती आणि एकता यांच्या उत्तुंग दीपस्तंभाप्रमाणे महाराष्ट्र उभा आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी काम करत राहण्याच्या आमच्या बांधिलकीचा आम्ही देखील पुनरुच्चार करत आहोत. महाराष्ट्राच्या जनतेला माझ्या हार्दिक शुभेच्छा!

पंतप्रधान मोदींनी गुजरातमधील नागरिकांना राज्याच्या स्थापना दिनानिमित्त गुजराती भाषेत शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या एक्स अकाऊंटवरून ह्या शुभच्छा दिल्या आहेत. पोस्टमध्ये म्हटले आहे की, गुजरात राज्य स्थापना दिनाच्या या शुभ प्रसंगी, मी राज्याचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, उल्लेखनीय कामगिरी आणि लोकांच्या चैतन्यशील भावनेचे स्मरण करतो. उद्योजकता, अनुकुलन आणि सर्वसमावेशक विकासाच्या मूल्यांनी गुजरात सदैव समृद्ध होवो या प्रार्थनेसह सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा!