नागपूर

सोने पुन्हा महागले !

नागपूर – सोन्याच्या दरात होणारी वाढ काही केल्या थांबायला तयार नाही. मार्चमध्ये दरवाढीचा नवीन विक्रम गाठत सोने प्रति दहा ग्रॅम जीएसटीविना ६८,५०० रुपयांवर पोहोचले आहे. अशीच दरवाढ सुरू राहिल्यास गुढीपाडव्याला सोन्याचा दर ७५ हजार राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

गेल्या महिनाभरापासून सोन्याचा दर सातत्याने वाढत आहे. काही दिवसांपूर्वीच आजवरचा उच्चांकी आकडा गाठत सोने प्रति दहा ग्रॅम ६७ हजारांवर पोहोचले होते. त्याला काही दिवस लोटत नाहीत तोच नवा उच्चांकी आकडा सोन्याने गाठला आहे. जागतिक स्तरावरील अस्थिरता पाहता सोन्याचे दर वाढत असल्याचे सांगण्यात येत आहे.

ही स्थिती पुढील काही दिवस कायम राहणार असल्याचेही सराफा व्यापा-यांचे म्हणणे आहे. त्यामुळे येणारा गुढीपाडवा आजवरच्या सर्वाधिक सोनेदराचा ठरणार आहे. साधारणपणे, जेव्हा सोन्याचा दर वाढत असतो तेव्हा खरेदी वाढते. दर अधिक वाढेल या भावनेने आहे त्या दरामध्ये सोने खरेदी करण्याकडे बहुतांश ग्राहकांचा कल असतो. काही ग्राहक मात्र दर कमी होण्याची प्रतीक्षा करतात.