आंतरराष्ट्रीय

इस्रायल-इराण युद्धावर एलॉन मस्क यांची लक्षवेधी

मुंबई – इस्रायल विरुद्ध हमास युद्धाला सहा महिने पूर्ण होत नाहीत, तोवरच आता इस्रायल आणि इराण यांच्यात संघर्ष पेटला आहे. इराणने दोन दिवसांपूर्वी अनेक क्षेपणास्त्र इस्रायलवर डागले होते. त्यानंतर आता इस्रायकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. मध्य इराणच्या इसफहान शहरावर इस्रायलने क्षेपणास्त्र सोडल्याची बातमी समोर येत आहे. त्यानंतर शुक्रवारी स्पेसएक्स, टेस्ला आणि सोशल मायक्रोब्लॉगिंग एक्स या साईट्सचे प्रमुख असलेल्या एलॉन मस्क यांनी या संघर्षावर लक्षवेधी अशी प्रतिक्रिया दिली आहे. एकप्रकारे दोन्ही देशांनी शांतता ठेवावी, असाच अर्थ मस्क यांच्या प्रतिक्रियेतून ध्वनित होत आहे.

एलॉन मस्क हे उपरोधिक पोस्ट टाकण्यासाठी चांगलेच प्रसिद्ध आहेत. ते स्वतःवरही कधी कधी उपरोधिक पोस्ट करतात. यावेळी त्यांनी एक्सवर टाकलेल्या पोस्टमध्ये गंभीर विवेचन केले आहे. “आपण एकमेकांवर क्षेपणास्त्र (रॉकेट) डागण्यापेक्षा, ते परग्रहांवर पाठवायला हवेत”, अशी प्रतिक्रिया मस्क यांनी दिली आहे. तसेच मजकुरासह त्यांनी स्पेसएक्सने अवकाशात प्रक्षेपित केलेल्या रॉकेटचा एक फोटो जोडला आहे.