Drought
पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

रक्षाबंधन, गोकुळाष्टमी, पोळा, गणपती उत्सवावर दुष्काळाचे सावट

२७ ऑगस्ट अकोला :’सुखी असेल शेतकरी तरच समाधानी होईल जनता’ या ब्रीद वाक्याप्रमाणे बळीराजावर आलेल्या दुष्काळाच्या सावटाने त्यावर आधारित सण-उत्सव, व्यापारी, बाजारपेठांवर त्याचा परिणाम झाला आहे. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या रक्षाबंधन , गोकुळाष्टमी, पोळा, गणपती उत्सवावर दुष्काळाचे मळभ दाटले असून आतापासूनच बाजारपेठांमध्ये शुकशुकाट असल्याचं चित्र आहे.

पावसाळा सुरू होऊन जवळपास तीन महिन्याचा कालावधी होत आलेला आहे, पण अजूनही शेतातून पाणी न निघाल्याने शेतकर्‍यांचा खरीप हंगाम वाया गेल्यात जमा असून पुढील रब्बी हंगामाचे भविष्य ही अधांतरीच असल्याने विशेष म्हणजे या खरीप हंगामावर शेतकर्‍यांचे तसेच व्यापार्‍यांचे आर्थिक गणित अवलंबून असते.

मात्र यंदा पावसाने बळीराजाच्या स्वप्नावर जणू पाणी फेरेल्याची परिस्थिती निर्माण झाली असून ग्रामीण भागातील शेतकर्‍यांचा आर्थिक कणा कोलमडल्याने पुढे येणार्‍या सणांवर दुष्काळाचे सावट पसरले असून बाजारपेठासह ग्रामीण भाग थंडावला आहे. शेतकर्‍यांना खरीप हंगामातील ( मका, मूग, उडीद, तुर, कपाशी, बाजरी ही खरीपातील पिके कमी कष्टाची असून या पिकातून शेतकर्‍यांना पुढील भांडवलासह सण उत्सवासाठी होणारा खर्चही भरून निघत असतो.

सर्व रान शिवार फुलून गेलेलं असता. निसर्ग देखील भरभरून देत असतो. मात्र यंदा निसर्गासह खरीप हंगामावर पावसाची आभाळमाया नसल्याने पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात खरीप हंगामातून येणार्‍या उत्पन्नावरच पाणी फेरले आहे.

त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. पाऊस न पडल्यामुळे खरिपाची पूर्ण वाट लागली असून शेतकर्‍यांनी घरातील असलेले चार पैसे खर्च करून पीक उभे केले, त्या खरिपातून शेतकर्‍यांना कवडीचेही उत्पादन निघणार नसल्याचे चित्र आहे. शेतकरी मात्र उसनवारीने, दागिने गहाण ठेवून उभी केलेली पिके मात्र डोळ्यादेखील वाळून जात असल्याने बळीराजावर आर्थिक संकट ओढवण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

दरम्यान, दोन दिवसांवर येऊन ठेवलेल्या रक्षाबंधन सणावरही दुष्काळाच्या सावट असून रक्षाबंधनासाठी होणारी खरेदी थंडावली आहे. बहीण भावाच्या नात्याला साद घालणारा रक्षाबंधन सणाला बळीराजा सुखावलेला असतो. घरातली मुलगी माहेरी येणार असते, घरात अनेक दिवसांनंतर गोड धोड होत असते.

मात्र अशातच पावसाने ओढ दिल्याने बळीराजा चिंतेत आहे, त्यामुळे सण कसा साजरा असा पेचप्रसंग बळीराजापुढे येऊन ठेपला आहे. तसेच पंधरा दिवसावर आलेल्या पोळा सणावर देखील दुष्काळाचे सावट असून बैलांसाठी लागणारा साज ही महागल्याने शेतकर्‍यांना ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी परिस्थिती झाली आहे.

वर्षभर लागणारी धनधान्य, जनावरांच्या चार्‍याचाही प्रश्न गंभीर बनत चालला असून ग्रामीण भाग पावसाच्या प्रतीक्षेत मेटाकुटीस आला आहे. तसेच तरुणाईचा उत्साहाचा सोहळा म्हणजे गणपती उत्सव, या सणावरही दुष्काळाचे सावट असून गणपती बाप्पांच्या मूर्तींच्या किमती वाढल्याने व सजावटीचा साजही महागल्याने गणपती उत्सव साजरा कसा असाही प्रश्न उपस्थित झाला आहे.