महाराष्ट्र

राजसाहेब ठाकरे यांच्यावर वैयक्तिक टीका नको

मुंबई – राज ठाकरे म्हणजे फुसका लवंगी फटाका आहे अशा शब्दांत ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी केली आहे. राज ठाकरेंच्या सभेमुळे कोकणात काही फरक पडणार नाही, असे म्हणत विनायक राऊत यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला. त्यांच्या या टीकेला मनसे नेते अमेय खोपकर यांनी चोख प्रत्युत्तर दिल आहे. ‘ राजसाहेब ठाकरे यांच्यावर वैयक्तिक टीका सहन केली जाणार नाही. तुमच्यासारखी घाणेरडी पातळी काही आम्हाला गाठता येणार नाही, पण प्रत्युत्तर देण्याचे इतर मार्गही आमच्याकडे आहेत एवढं लक्षात असू दे. ही धमकी समजा नाहीतर खुलं आव्हान… ‘ असं म्हणत अमेय खोपकर यांनी विनायक राऊत आणि संजय राऊत यांना इशारा दिला आहे.

कोकणात भाजपा नेते नारायण राणे यांचा विरुद्ध ठाकरे गटाचे नेते खासदार विनायक राऊत असा सामना रंगणार आहे. त्याचदरम्यान प्रचाराच्या निमित्ताने मनसे प्रमुख राज ठाकरे आणि भाजप नेते नारायण राणे कणकवलीमध्ये एकाच मंचावर एकत्र येणार आहेत. तेथे राज ठाकरे यांची तोफ धडाडणार अशी चर्चा आहे. त्या मुद्यावरून विनायक राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा ‘ राज ठाकरे म्हणजे फुस्स झालेला लवंगी फटाका आहे, त्याचा कोकणामध्ये काहीच फरक पडणार नाही’ असे म्हणत विनायक राऊत यांनी राज ठाकरेंवर टीका केली होती. मात्र त्यांची ही टीका मनसे नेत्यांना काही रुचलेली नसून अमेय खोपकर यांनी ट्विट करत विनायक राऊत यांना थेट इशारा दिला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरून एक ट्विट करत अेय खोपकरांनी विनायक राऊत आणि संजय राऊत यांना चांगलंच सुनावलं.