अकोला

भावना गवळींची नाराजी दूर?

वाशिम : मी नाराज होणा-यांपैकी नाही. परंतु उमेदवारी न मिळाल्याने मला खंत वाटली. खंत वाटल्याने मी बाहेर पडली नाही. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमच्या पक्षाचे सर्वेसर्वा आहेत. त्यांनी ज्याप्रकारे राज्यात काम केले आहे. पोटतिडकीने ते रात्रंदिवस काम करतायेत. त्यात अबकी बार ४०० पार या यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेला साद देत मी महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचाराचं काम करणार आहे असे विधान यवतमाळ वाशिमच्या खासदार भावना गवळी यांनी केले आहे. त्यामुळे भावना गवळी यांची नाराजी दूर करण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना यश आल्याचे दिसून येते.

भावना गवळी म्हणाल्या की, मित्रपक्ष आणि घटक पक्षासोबत आमची आजपासून बैठक, मेळावे सुरू होतील. राजश्री पाटील यांना विजयी करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. मी २५ वर्षापासून काम करते, शिवसेना जिल्हाप्रमुख, खासदार म्हणून काम केलेय. माझे वडील शिवसेनेत होते. लहानपणापासून बाळकडू मिळाले आहे. मला काय भेटते यासाठी मी काम करत नाही. माझे लक्ष पदावर नव्हते. जनतेने माझ्यावर विश्वास टाकला आहे त्याला तडा जाणार नाही यासाठी मी काम करत आहे. माझ्यासाठी शिवसेना पक्ष महत्त्वाचा आहे असे त्यांनी म्हटले.

तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत चर्चा चांगली झाली. पुढच्या काळात कसा प्रचार करायचा, कशा जबाबदा-या घ्यायच्या त्यावर चर्चा झाली. राजश्री पाटील यांना निवडून आणण्याची जबाबदारी माझ्यावर दिली आहे. ज्यारितीने माझा प्रचार मी करत होते, तसेच महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. जे काही झाले ते भूतकाळ आहे.