Death of nearly 150 sheep in Deori Phata area?
अकोला

देवरी फाटा परिसरात १५०च्या जवळपास मेंढरांचा मृत्यू?

अकोट प्रतिनिधी : अकोट-अकोला मार्गावरील देवरी फाटा परिसरातील एका शेतात विषबाधा झाल्याने तब्बल १५० मेंढरांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली.

तेल्हारा तालुक्यातील पिंपळनेर येथील सुखदेव महारनर व त्यांचे बंधू नत्थू महारनर यांच्या मालकीचे जवळपास ५०० मेंढरं चराईसाठी देवरी फाटा परिसरातील शेतात मुक्कामाला आहेत.

त्यापैकी १५० मेंढरांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. मागील दोन दिवसापासून कळपातील मेंढरं हे अचानक खाली कोसळताच त्यांचे पोट फुगते तडफडतात व मृत्युमुखी पडतात असा प्रकार गेल्या दोन दिवसापासून घडत आहे.

तर आणखी १०० ते १५० मेंढरांना अन्नातून विषबाधा झाल्याचा अंदाज त्यांच्या मालकांनी व्यक्त केला. खासगी डॉक्टरांकडून तसेच देवरी येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचे डॉक्टर म्हस्के, अकोट येथील पालखडे मुंडगाव येथील डॉक्टर अढाऊ व आजूबाजूच्या परिसरातील खासगी डॉक्टर हे शर्थीचे प्रयत्न करून मेंढरांना वाचवण्याचा प्रयत्न करीत आहेत.

सुखदेव व त्यांचा भाऊ नत्थू महारंनर हे गेल्या काही दिवसांपासून देवरी फाटा परिसरात आहेत. ते शेतकऱ्यांच्या शेतात मेंढरांचे कळप बसवतात. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीला खत मिळून उत्पादनात वाढ होते. परंतु अचानक असे संकट त्यांच्यावर कोसळल्यामुळे लाखो रुपयांचे त्यांचे नुकसान झालेले आहे.

सदर बाबीची माहिती मिळताच दहीहांडा पोलिस स्टेशनकडून घटनास्थळी जाऊन पंचनामा करण्यात आला. पुढील तपास चालू आहे. सदर मेंढरांचा मृत्यू हा चारा व पाणी यामुळे झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.सदर मेंढपाळावर मोठ्या प्रमाणात संकट कोसळले आहे.