देश

नाव बदलण्याचा कोणताही परिणाम होत नाही – एस. जयशंकर

मुंबई – अरुणाचल प्रदेशवरून भारत आणि चीन यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू आहे. चीनने अरुणाचल प्रदेश राज्यावर दावा ठोकला आहे. परंतु, अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचं केंद्राने निक्षूण सांगितलं आहे. आता यावरून केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनीही चीनला सुनावलं आहे. फ्री प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

अरुणाचल प्रदेशचं नाव बदलल्याने कोणताही परिणाम होणार नाही. तसंच, ईशान्य राज्य भारताचा भाग होता, आहे आणि कायमच राहील, असंही ते म्हणाले. जयशंकर सोमवारी इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री आणि सदर्न गुजरात चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री यांनी सादर केलेल्या कॉर्पोरेट समिट २०२४ मध्ये बोलत होते.

“आज मी तुमच्या घराचे नाव बदलले तर ते माझे होईल का? अरुणाचल प्रदेश हे भारताचे राज्य होते, आहे आणि राहील. नाव बदलण्याचा कोणताही परिणाम होत नाही”, असं ते म्हणाले. “आमचे सैन्य प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तैनात आहेत”, असंही त्यांनी पुढे स्पष्ट केलं.