महाराष्ट्र

बजरंग सोनवणेंनी कुणबी प्रमाणपत्र काढून ओबीसीत प्रवेश 

मुंबई – बजरंग सोनवणे यांनी कुणबी प्रमाणपत्र काढून ओबीसीत प्रवेश केला, मग बीडमधील लोकसभा निवडणूक मराठा विरुद्ध ओबीसी कशी? असा सवाल मंत्री धनंजय मुंडे यांनी उपस्थित केलाय. पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी धनंजय मुंडे यांनी आज आष्टीमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. यावेळी ते बोलत होते.
सर्वात पहिल्यांदा गरीब कुटुंबांचे कुणबी प्रमाणपत्र काढून दिले असते धनंजय मुंडे म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांनी जे आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाला माझे यश आलं. याचा फायदा सर्वात पहिल्यांदा बजरंग सोनवणे यांनी घेतला. त्यांनी आपलं कुणबी प्रमाणपत्र काढून घेतलं, मी जर त्यांच्या जागी असतो तर सर्वात पहिल्यांदा गरीब कुटुंबांचे कुणबी प्रमाणपत्र काढून दिले असते, असे म्हणत मुंडेंनी पुन्हा एकदा सोनवणे यांच्यावर टीका केली.

पुढे बोलताना मुंडे म्हणाले, लोकसभेच्या निवडणुकीत मी मराठा आहे असं सांगायचं आणि खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत इतर मागासवर्गीय म्हणून अर्ज भरायचा. हे जातीपातीचे राजकारण परवडणार नाही. कुणी कोणत्या जातीत जन्माला यायचं हे आपल्या कोणाच्याच हातात नाही, मी देखील मराठा आरक्षणाच्या चळवळीत काम करत आहे, असंही मुंडे यांनी सांगितलं.

बीड जिल्ह्याच्या जनतेने 1957 मध्ये देखील जातीपातीचा विचार न करता कर्तुत्वान असलेले ब्राह्मण समाजाचे नेते परांजपे यांना लोकसभेच्या निवडणुकीत निवडून दिलं होतं. बीड जिल्ह्याची जनता कधी जात-पात पाहत नाही, तर कर्तुत्व पाहून मतदान करत असते. बीड जिल्हा हा नेहमी जातपात पाहून नाही तर कर्तृत्व पाहून मतदान करत असतो हे काही लोकांना अजूनही कळालेलं नाही. सरकारने शब्द दिल्याप्रमाणे मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलं आहे. सगे सोयऱ्याच्या संदर्भात थेट जीआर काढता येत नाही, त्यासाठी अगोदर परिपत्रक काढावे लागते. परिपत्रकावर आलेले आक्षेप निकाली काढून त्याचा जीआर नंतर काढला जातो.