मनोरंजन

महिला दिनानिमित्त तेजस्विनी पंडितच्या ‘येक नंबर’ची घोषणा

मुंबई, 8 मार्च :महिला दिनानिमित्ताने वर्धा नाडियाडवाला यांच्या जोफिएल एंटरप्राईज आणि तेजस्विनी पंडित यांच्या सह्याद्री फिल्म्स निर्मित, नाडियाडवाला ग्रॅण्डसन एंटरटेनमेंट प्रस्तुत एका मोठ्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. या शुभदिनी या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून ‘येक नंबर’ असे या चित्रपटाचे नाव आहे. ‘व्हेंटिलेटर’, ‘फेरारी की सवारी’ सारखे सुपरहिट चित्रपट देणारे राष्ट्रीय पुरस्कार विजेते राजेश मापुस्कर या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. तर छायाचित्रणाची धुरा संजय मेमाणे यांनी सांभाळली आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीचे चित्र नव्याने उलगडणार, हे नक्की !

‘येक नंबर’ अशी प्रेमकथा आहे, जी राजकीय पार्श्वभूमीवर आधारित असणार आहे. नातेसंबंधांच्या गुंतागुंतीवर भाष्य करणारा हा चित्रपट प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवणारा असेल. संगीतप्रेमींना भुरळ घालणाऱ्या अजय-अतुल या प्रशंसनीय जोडीचे संगीत या कथानकात अधिकच भर टाकणार आहे. महाराष्ट्रातील वाई, जुन्नर, मुंबई आणि कोकण यांसारख्या नयनरम्य ठिकाणी ‘येक नंबर’चे ५२ दिवस चित्रीकरण होणार आहे.