अकोला: अभय पाटील यांच्या निवासस्थानावर आज मविआची बैठक पार पडली. या बैठकीला अकोल्यातील महाविकास आघाडीतले तिन्ही घटक पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते. ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख, शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर यांच्यासह ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख गोपाल दातकर या बैठकीला प्रमुख म्हणून होते.
महाविकास आघाडीत अकोल्याच्या उमेदवाराबद्दल अजूनही संभ्रम आहे. मात्र, अकोल्यात मविआचं ठरलं. डॉ. अभय पाटील हेचं अकोल्यात मविआचे उमेदवार असणार. येत्या ४ एप्रिल रोजी काँग्रेस नेते आणि इतर आघाडीतील पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत अभय पाटील हे नामाकांन अर्ज दाखल करणार आहेत. अकोल्यातील मविआच्या बैठकीत आज या निर्णयावर शिक्कामोर्तब झाला आहे.
आता मविआत वंचितच्या समावेशाबद्दल आशा मावळली आहे. एकंदरीत राज्यात वंचितनं काँग्रेसला २ ठिकाणी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे अकोल्यात काँग्रेस आंबेडकरांना पाठिंबा देणार, अशा चर्चा होत्या. या चर्चेंवर स्थानिक मविआच्या प्रमुख नेत्यांनी फुलस्टॉप दिला आहे. हे शक्य नाही, आमचं ठरलंय. अकोल्यात डॉ. अभय पाटील हेचं उमेदवार असणार, असं तिन्ही पक्ष प्रमुखांचं म्हणंण आहे. दरम्यान निश्चितपणे मविआचे उमेदवार अभय पाटीलच असणार. प्रकाश आंबेडकरांनी विचार करावा आणि मविआसोबत यावं, अशी इच्छा ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांनी व्यक्त केली आहे.