विदर्भ

मुनगंटीवार यांच्या अडचणीत प्रचंड वाढ

नागपूर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार सभेत सुधीर मुनगंटीवार यांनी १९८४ च्या शीख दंगलीवरून भाऊ-बहिणीच्या नात्याचे उदाहरण देऊन केलेले वक्तव्य त्यांना चांगलेच अडचणीत आणणारे ठरत आहे. काँग्रेसने ही नामी संधी हेरून आपल्या प्रचारात या वक्तव्याचा आधार घेत मते मागायला सुरुवात केली आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील मतदार काँग्रेसच्या या प्रचाराचे मतात रूपांतर करतात की भाजपची बाजू समजून मतदान करतात हे बघण्यासारखे आहे. चंद्रपूरच नव्हे, तर वर्धा लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवारही याचा पुरेपूर लाभ घेत असल्याची चर्चा आहे. नरेंद्र मोदी यांची सोमवारी चंद्रपुरात सभा होती. यामध्ये मुनगंटीवार यांनी काँग्रेस राजवटीत झालेल्या शीख दंगलीचा संदर्भ घेऊन काँग्रेसवर टीका केली. दंगलीचे शाब्दिक चित्रण करताना त्यांनी भाषणातून भाऊ-बहिणीच्या नात्याला काळीमा फासण्याचे काम काँग्रेसने केले, असा आरोप केला. या भाषणानंतर काहींनी सुरुवातीचे भाषण गहाळ करून भाऊ-बहिणीचा उल्लेख असलेल्या वक्तव्याची क्लिप तयार करून ती व्हायरल केली. त्यानंतर मुनगंटीवार यांच्यावर शाब्दिक चिखलफेक सुरू झाली असून, वातावरण तापले आहे.