मुंबई

बेस्टकडून 700 एसी डबलडेकर बसचे कंत्राट रद्द

मुंबई : बेस्टकडून 700 एसी डबलडेकर बसचे कंत्राट रद्द केल्याची माहिती समोर येत आले. विशेष म्हणजे संबंधित कंपनीची अनामत रक्कम गोठवल्याचेही समजते. करार केलेल्या कंपनीकडून मागील वर्षभरात एकही एसी डबलडेकर बस न आल्याने बेस्टकडून संबंधित कंपनीचे कंत्राट रद्द करत अनामत रक्कम जप्त करण्यात आली आहे. बेस्ट उपक्रमाला प्रवाशांच्या सेवेसाठी आणखी 3000 बस गाड्यांची गरज असताना करार रद्द केल्याचा फटका प्रवाशांनी बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मागील दोन ते तीन वर्षांपासून इव्हीच्या बसेस दाखल होत आहेत. प्रवाशांसाठी मोठ्या प्रमाणात सरकारकडून ईव्हीच्या गाड्या घेतल्या जात आहेत. मात्र त्याचा पुरवठा होत नाही. परिणामी बेस्ट प्रशासनाकडून 700 एसी डबल डेकर बसचे करार करण्यात आला होता. मात्र त्या 700 मधील एकही बस बेस्टच्या ताफ्यात दाखल न झाल्याने हे कंत्राट रद्द करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दुसऱ्या कंपनीकडून जवळपास 200 डबल डेकर एस बस गाड्यांचा बेस्ट सोबत करार आहे. यातील 50 गाड्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. उर्वरित 150 गाड्या लवकरच ताफ्यात दाखल होण्याची शक्यता आहे. मात्र, 700 गाड्यांचे कंत्राट रद्द झाल्याने प्रवाशांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागणार आहे. बेस्टच्या ताफ्यात आजच्या घडीला एकूण 3 हजार 40 गाड्या आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून बेस्ट बससाठी बस थांब्यांवर प्रवाशांच्या लांबचलांब रांगा लागू लागल्या आहेत. बसमधील प्रवाशांची गर्दी, बस थाब्यांवर गर्दी यामुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे गेल्या काही महिन्यांपासून थांब्यावर बस येण्याच्या कालावधीतही दुपटीने वाढ झाली आहे. पूर्वी ३० मिनिटांवर असलेला हा कालावधी आता तब्बल एक तासावर पोहोचला आहे.

दरम्यान, बेस्ट बस म्हटलं की, एकेकाळी दिवसाला 45 लाख प्रवासी घेऊन धावणारी बस. पण आता याच बेस्टच्या प्रवाशी संख्येत दिवसेंदिवस घट होत आहे. बेस्ट उपक्रमाने बस ताफा वाढवण्याचा संकल्प सोडला असला तरी, हे उद्दीष्ट्य साध्य होऊ शकलेले नाही. जुन्या गाड्या भंगारात काढाव्या लागल्यामुळे गाड्यांची संख्याही कमी होऊ लागली आहे. त्यामुळे बस फेऱ्यांची संख्या घटली आहे. बसची वाट पाहून कंटाळलेले प्रवासी रिक्षा, टॅक्सीकडे वळत आहेत. त्यामुळे बेस्टच्या प्रवाशांची संख्या आणखी रोडावत आहे.