आरोग्य

५१३ कोटींच्या ‘त्या’ प्रकल्पाला वैद्यकीय शिक्षण विभागाकडून स्थगिती

मुंबई : राज्यातील वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांमध्ये आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणाली (एचएमआयएस) उपक्रम राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने तीन वर्षांपूर्वी घेतला होता. महाराष्ट्र माहिती व तंत्रज्ञान महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पासाठी ५१३ कोटी ४३ लाख ११ हजार रुपये खर्च अपेक्षित होता. मात्र, या प्रकल्पाला स्थगिती देण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षण विभागाने घेतला आहे.
१६ वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांतील डॉक्टर, कर्मचाऱ्यांना ओपीडी आणि अतितत्काळ विभागातील केसपेपर नोंदणी, पॅथॉलॉजी अहवाल, एक्स-रे आणि सोनोग्राफीचे अहवाल, तसेच डिस्चार्ज कार्ड तयार करणारी यंत्रणा मागील सात महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे डॉक्टरांना सर्व माहिती हाताने लिहून काढावी लागत आहे. परिणामी ही प्रणाली लवकर सुरू व्हावी, अशी आग्रही मागणी होत आहे. मात्र, या प्रणालीत काही त्रुटी आढळून आल्याने त्यास स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच ‘एचएमआयएस २’ प्रकल्प राबविण्याचे शासनाच्या विचाराधीन असल्याचे कळते.
या रुग्णालयांचा समावेश
मुंबईतील सर जे.जे. रुग्णालय, सेंट जॉर्ज रुग्णालय, कामा आणि आल्बेस रुग्णालय, जी.टी. रुग्णालयाचा यात समावेश होता. तर उर्वरित महाराष्ट्रातून महाराष्ट्र पुणे, नागपूर, यवतमाळ, लातूर, मिरज-सांगली, औरंगाबाद, अकोला, सोलापूर, नांदेड, अंबाजोगाई, सांगली येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालये एचएमआयएस प्रणालीसाठी निवडण्यात आली होती.