शिक्षण ही खरे तर लहान मुलांसाठी आनंददायी प्रक्रिया. पण त्यात नवनवे बदल करण्याच्या नादात ही प्रक्रिया दिवसेंदिवस अधिकाधिक गुंतागुंतीची होत चालली आहे. पाठय़पुस्तकात वह्यांची पाने समाविष्ट करण्याचा निर्णय त्यापैकीच एक म्हणावा लागेल..यापुढील काळात शालेय शिक्षण कसे असावे, याचे एक चित्र ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये’ उभे करण्यात आले आहे. या धोरणावर आधारित कोणतेही ठोस कार्यक्रम राज्यस्तरावर अजून समोर आलेले नसल्याने त्याची अंमलबजावणी कशी होईल हे आताच ठरवणे अवघड आहे.
मात्र सध्या नव्याने आणि ‘पथदर्शी’ म्हणून जे बदल करण्यात येत आहेत, त्यावरून काही अंदाज बांधता येतील. शालेय पाठय़पुस्तकांत वह्यांची पाने समाविष्ट करण्याचा जो शासन निर्णय ८ मार्च २०२३ रोजी प्रकाशित करण्यात आला आहे, तो या संदर्भात पाहण्यासारखा आहे.मुलांच्या दप्तराचे आणि पाठय़पुस्तकांचे वजन लक्षणीयरीत्या कमी करण्यासाठी एनसीईआरटी, शाळा, शिक्षक या सर्वानी एकत्रित प्रयत्न करावेत आणि त्यासाठी अभ्यासक्रम आणि अध्यापन पद्धतीत आवश्यक ते बदल करावेत, हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात नमूद आहे. पाठय़पुस्तकांत वह्यांची पाने देण्याची चर्चा सुरू झाली तेव्हा पुस्तकात कोरी पाने जोडली, की मुलांना वेगळय़ा वह्या नेण्याची गरज राहणार नाही, हेच कारण देण्यात आले होते. परंतु वह्या बंद करण्याची कल्पना व्यवहार्य नाही आणि शैक्षणिकदृष्टय़ाही योग्य नाही अशा प्रतिक्रिया आल्यावर वर्गकार्य, गृहपाठ, सराव वगैरे गोष्टींसाठी वेगळय़ा वह्या पूर्वीप्रमाणेच चालू राहतील अशी मुभा सदर शासन निर्णयात देण्यात आली.
खरे तर वह्यांना पर्याय नाही, हे स्पष्ट झाल्यावर पाठय़पुस्तकांत वह्यांची पाने जोडण्याची कल्पनाही मागे पडायला हवी होती. पण तसे झाले नाही. पुस्तकांना वह्यांची पाने तरीही जोडायचीच आहेत. मग त्यामुळे वाढणार्या ओझ्याचे काय करायचे? त्यासाठी ‘एकात्मिक’ स्वरूपाच्या पुस्तकांची योजना आखण्यात आली. म्हणजे काय, तर प्रत्येक विषयाला आता जी स्वतंत्र पाठय़पुस्तके आहेत त्यांचे चार तुकडे पाडण्यात येतील. प्रत्येक विषयाचा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा तुकडा एकत्र जोडून चार पुस्तके तयार करण्यात येतील. मुलांनी शाळेत जाताना प्रत्येक पुस्तकाचा पाव हिस्सा असणारे कोणते तरी एकच पुस्तक घेऊन जायचे आहे. अशा रीतीने दप्तरातील पाठय़पुस्तकांचे तीन-चतुर्थाश वजन एकदम कमी झाल्यामुळे वह्यांची पाने जोडली, तरी शाळेत न्यायच्या पाठय़पुस्तकांचे वजन कमीच राहील, असा हा चतुर उपाय आहे.
त्यात आशयाचे ओझे कोणत्याही प्रकारे कमी होणार नाही, छोटय़ा सुटसुटीत पाठय़पुस्तकांपेक्षा मुलांना दर वेळी एक भलामोठा जाडजूड ग्रंथ हाताळावा लागेल, वाचण्यासाठी तयार केलेले पुस्तक आणि लिहिण्यासाठी तयार केलेली वही एकत्र आल्याने या दोन पूर्णपणे वेगळय़ा साधनांची सांगड घालताना शिक्षक आणि विद्यार्थ्यांची तारांबळ उडेल, हे तर स्पष्टच आहे. पण त्यात आणखीही शैक्षणिक बाबी गुंतलेल्या आहेत.पाठय़पुस्तकात जोडलेल्या या कोर्या पानांवर ‘माझी नोंद’ या सदराखाली मुलांनी पुढील नोंदी कराव्यात असे शासन निर्णयात सांगितलेले आहे. शब्दार्थ, महत्त्वाचे सूत्र, महत्त्वाचे संबोध, (शासन निर्णयात ‘महत्त्वाचे संबोधन’ असे म्हटले आहे, पण त्यातून काहीच अर्थबोध होत नाही, त्यामुळे तो मुद्रणदोष असावा असे धरू) महत्त्वाची वाक्ये, टिपण, इत्यादी. या सर्व गोष्टी तर पाठय़पुस्तकांत दिलेल्याच असतात. इतकेच नाही, तर प्राथमिक स्तरावरील पाठय़पुस्तकात चौकटी, ठळक टाइप, रंगीत हायलाइट, इत्यादींचा वापर करून त्या अगदी उठून दिसतील अशा रीतीने समाविष्ट केलेल्या असतात.
पाठाखाली ‘आपण काय शिकलो’, ‘आपण समजून घेऊ या’, इत्यादी शीर्षकांखाली त्यातील महत्त्वाच्या मुद्दय़ांचे टिपण असते, मग त्याच बाबी पुन्हा या कोर्या पानांवर उतरवून काय साध्य होणार? की पुस्तकांतील स्पष्टीकरण, विवेचन, उदाहरणे या गोष्टी पुन:पुन्हा वाचण्याची गरज नाही, परीक्षेच्या दृष्टीने उपयोगाच्या गोष्टीच फक्त या पानांवर उतरवा आणि तेवढय़ाच पाठ करा, असा हा संदेश आहे?राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात ‘पाठय़पुस्तकांचे वजन कमी करा’ ही अपेक्षा एका विस्तृत संदर्भासह आली आहे. त्यात घोकंपट्टी टाळण्याला खूप महत्त्व दिले आहे. त्याऐवजी मुलांमध्ये विकसित करण्याची कौशल्ये आणि क्षमता यांची एक सविस्तर यादीच राष्ट्रीय धोरणात आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन आणि पुराव्याच्या आधारे करायचा विचार, कल्पकता, नावीन्यपूर्ण गोष्टी करून पाहण्याची आवड, कलात्मक आणि सौंदर्यपूर्ण दृष्टी, संवादमाध्यमाच्या विविध प्रकारांची हाताळणी, इतरांबरोबर संघभावनेने काम करणे, तर्कशुद्ध विचार करून समस्या सोडवणे, योग्य-अयोग्य ठरवता येणे, या आणि अशा कित्येक मुद्दय़ांना वर्गाध्यापनात आणि पाठय़पुस्तकांत महत्त्वाचे स्थान मिळावे हे त्यात अधोरेखित केले आहे.