Drugs-trading
संपादकीय

संपादकीय : मादक पदार्थांचा व्यापार 

मुंबईहून गोव्याकडे जाणार्‍या क्रूझमध्ये प्रवास करताना मादक पदार्थांचे सेवन करणार्‍या आर्यन खान आणि इतरांना झालेली अटक काय दर्शविते? देशात मादक पदार्थांचा व्यापार वाढत चालला आहे आणि तरुणाई नशेच्या आहारी चालली आहे, असेच संकेत मिळाले आहेत.

मादक पदार्थांचे सेवन करताना धनाढ्य बापाच्या मुलांना अटक झाल्याची ही काही पहिलीच कारवाई नाही. याआधी देशाच्या विविध भागांत अशा अनेक कारवाया झाल्या आहेत. अधूनमधून अशी प्रकरणे समोर येतात, त्यामुळे समाजमन खिन्न होते; भयभीत होते आणि काही दिवस लोटताच पुन्हा सगळे काही सुरळीत होते. परंतु, गेल्या काही वर्षांत अशी प्रकरणे वारंवार उघडकीस येत आहेत.

विशेषत: कोरोनाचा काळ असताना अभिनेता सुशांतसिंह राजपूत याने केलेल्या आत्महत्येनंतर ज्या कारवाया झाल्या आणि गांजा, चरस, हेरॉईन यासारख्या नशा आणणार्‍या पदार्थांचे सेवन आणि खरेदी-विक्री करणार्‍या अनेकांना अटक करण्यात आली. दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर यांसारख्या अभिनेत्रींची चौकशी झाली. तेव्हापासून अशी प्रकरणे वेगाने पुढे येत आहेत.

हा आपल्या सगळ्यांच्या काळजीचा विषय आहे. उद्याच्या भारताचे भविष्य असलेली तरुण पिढी सक्षम झाली पाहिजे, आत्मनिर्भर झाली पाहिजे आणि पर्यायाने संपूर्ण देश समृद्ध-संपन्न झाला पाहिजे, हे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उराशी बाळगले आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी ते दिवसरात्र झटत आहेत.सगळ्यांनाच सरकारी नोकर्‍या मिळणे केवळ अशक्य आहे. त्यामुळे रोजगार निर्मितीवर सरकारचा भर आहे. विशेषत: स्वयंरोजगाराच्या संधी कशा निर्माण होतील, याकडे सरकार लक्ष देते आहे. पण, सरकारच्या या सत्कार्यात मिठाचा खडा टाकण्याचे पाप काही लोक करीत आहेत. तीन दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेने युवाविश्व ढवळून निघाले आहे.

बॉलिवूडचा बाहशहा म्हणवून घेणार्‍या शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला मादक पदार्थांचे सेवन केल्याप्रकरणी मादक पदार्थ नियंत्रण विभागाने अटक केली आहे. त्याच्यासोबत दिल्लीची तरुण मॉडेल मुनमून धमेचा आणि अरबाज मर्चंट यांनाही अटक झाल्याने खळबळ उडाली आहे. अटक होणार्‍यांची संख्या वाढतच चालली आहे. कारण, या प्रकरणाचे तार लांबपर्यंत जुळत चालले आहेत. मादक पदार्थांचे सेवन केवळ मुंबईसारख्या महानगरातच होते आणि धनाढ्य बापांची मुलंच फक्त नशाखोरी करतात, असे समजण्याचे कारण नाही. देशातील प्रत्येक राज्यात आणि राज्यांमधल्या गावोगावी मादक पदार्थ पोहोचले आहेत आणि तरुणाईकडून त्यांचे सेवनही केले जाते. अनेकदा अनेक जण पकडलेही जातात, पण त्याची चर्चा होत नाही. कारण, त्यात सेलिब्रिटींची मुलं नसतात वा स्वत: प्रसिद्ध व्यक्ती नसतात. सध्याच्या प्रकरणाची चर्चा होण्याचे कारण आहे शाहरुख खान. कारण, त्याचा मुलगा आर्यन याने मादक पदार्थांचे सेवन केले आहे.

त्याचा खरेदी-विक्रीत काही सहभाग आहे का, याचा तपास करण्यासाठी म्हणून त्याला तीन दिवसांच्या कोठडीत ठेवण्यात आले आहे. शाहरुखचा मुलगा नसता तर कदाचित या प्रकरणाची चर्चाही झाली नसती. शाहरुख मागे एकदा सिम्मी गरेवाल यांच्याशी बोलताना बरळला होता. मुलाला आपण सर्व प्रकारचे स्वातंत्र्य दिल्याचे मोठ्या अभिमानाने म्हणाला होता. आता त्याचा मुलगा अटकेत आहे आणि कोठडीतून बाहेर येण्याची प्रतीक्षा करण्यापलीकडे शाहरुखच्या हाती काहीही नाही. मागील आयपीएल सुरू असताना वानखेडे स्टेडियमवर शाहरुखने जो धिंगाणा घातला होता, त्याचा निषेध म्हणून त्याला वानखेडेवर प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली होती.

ही सगळी मस्ती आहे. कशाची मस्ती आहे ही? पैशांची? एक दिवस सगळी मस्ती उतरल्याशिवाय राहणार नाही, हे अशा लोकांनी लक्षात घेतले पाहिजे. मध्यंतरीच्या काळात देशाच्या काही भागात रेव्ह पार्ट्या झाल्या. काही ठिकाणी रेव्ह पार्ट्यामध्ये अल्पवयीन मुलेमुलीही आढळून आली. राजधानी दिल्लीतही प्रमुख शहरांमध्ये बाईकस्वार तरुण स्टंट करताना आढळून आले. अशा अनेक घटना घडल्या आहेत, घडत असतात. त्यामुळे तरुण पिढी वाहवत चालली आहे की काय, असे वाटणे स्वाभाविक आहे. तरुण मुलंमुली मादक पदार्थांचे सेवन करतात, ही चिंताजनक बाब आहे. मादक पदार्थांचे सेवन आणि रेव्ह पार्ट्यांच्या बातम्या ऐकून ज्यांना वयात आलेली मुलं आहेत; त्या आईबापाच्या मनाची अवस्था काय होत असेल, हे आपण समजू शकतो.

परंतु, एक बाब आपण लक्षात घेतली पाहिजे. ती ही की, आपल्या देशात जेवढी तरुणांची संख्या आहे, तेवढी जगातील कोणत्याच देशात नाही. सर्वाधिक तरुण भारतात आहेत आणि ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. तरुणांची एकूण संख्या लक्षात घेतली तर जे तरुण परंपरेला सोडून वागतात, मनमानी करतात, रेव्ह पार्ट्या करतात त्यांची संख्या कमी असली, तरी ती वाढत चालली आहे, ही काळजी करायला लावणारी बाब आहे. पण, नुसती काळजी करून काम भागायचे नाही. उद्याच्या भारताचे भवितव्य उत्तम असावे असे जर आपल्याला वाटत असेल, तर बालमनांवर चांगले संस्कार करण्याची प्रक्रिया अविरत चालली पाहिजे.

लहान मूल शाळेत जाण्यापूर्वी घरी आईवडिलांच्या अंगाखांद्यावर खेळत असते. मुलांना आईवडिलांचा सहवास लाभत असतो. तो जसा लहानपणी लाभतो तसाच तो मोठेपणीही लाभतो. लहान मुलांवर आईवडिलांनी उत्तम संस्कार केले आणि त्यांनी चांगली वर्तणूक करावी, अशी अपेक्षा करून स्वत:चे वर्तन चांगले ठेवले तर मुलांना चांगले वळण लागू शकते. पण, शाहरुखसारख्या वाईट गुण दिसूनही ते त्याला अडविण्याऐवजी पाहिजे ते करण्याची मोकळीक देत असतील तर दोष कुणाचा? आपल्या समाजात अहंकारही वाढीस लागला असल्याचे आपण सगळेच अनुभवतो आहोत.