Medical Expense
संपादकीय

संपादकीय : औषधांचा गैरवापर

भारतातील निम्म्यापेक्षा अधिक कुटुंबांत औषध सेवनाचा अतिरेक होतो असे एका पाहणीत आढळले यात अजिबात आश्चर्य नाही. एका वेळी एकापेक्षा अधिक खरे तर किमान पाच औषधे घेत असलेल्यांची वर्गवारी ‘पॉलीफार्मसी या गटात केली जाते. म्हणजे बहुऔषधजीवी, ही अशी बहुऔषधे घेण्यामागे बरीच कारणे असू शकतात. वृद्धत्व, त्यामुळे झालेली प्रकृतीची गुंतागुंत आणि अनेक आजार आदी.

यामागील काही नैसर्गिक कारणे. एका अर्थी हे योग्यही म्हणजे एखाद्यास दुर्दैवाने व्याधीच अनेक असल्या तर तो तरी विचारा काय करणार? तेव्हा प्रत्येक बहुऔषधजीवी हा औषधांचा गैरवापर करणारा असेलच असे नाही. पण त्याच वेळी हेही खरे की अनेक औषधे घेणाऱ्या प्रत्येकालाच इतक्या औषधांची गरज असेलच असे नाही.

भारताबाबत हे विधान प्रकर्षाने खरे ठरते. याबाबतच्या आंतरराष्ट्रीय पाहणीतील निष्कर्षानुसार निम्म्याहून अधिक भारतीय है जरुरीपेक्षा अधिक औषधांचे सेवन करीत असल्याचे आढळले. यात ही औषधे ज्यांनी घेणे आवश्यक आहे असा वर्ग आहेच. पण त्याचबरोबर गरज नसतानाही फुक्काफुकी गोळया / काढे येता-जाता तोंडात टाकणाऱ्यांचाही मोठा वर्ग आपल्यात आहे हे नाकारता येणारे नाही. याच बरोबरीने एक मोठा वर्ग आपल्याकडे असाही आहे की ज्यास नवनव्या औषधांचे प्रयोग करणे आवडते आणि त्याची ही औषध शोधयात्रा अखंड सुरूच राहते.

या वर्गाचे वैशिष्ट्य असे की हा स्वयंसिद्धा औषधसेवी इतरांच्याही डोक्यात या कथित औषधाचे गुणधर्म घुसवतो आणि हे ऐकणारा विचाराने हलका असेल तर त्यातून औषधाच्या दुरुपयोगासाठी आणखी एक वाटतो. या पाहणीच्या निमित्ताने औषध सेवनाच्या आजारावर भाष्य करणे आरोग्यासाठी आवश्यक. या औषधातिरेकामागे तीन प्रमुख कारणे संभवतात. वैयक सल्ला घेणे वेळेने आणि पैशाने परवडत नाही म्हणून थेट औषध दुकानांतूनच औषधे घेणारे पहिले. हा वर्ग प्रामुख्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल असतो.

त्यामुळे त्यांच्या औषधातिरेकामागे समर्थनीय नसले तरी एक कारण आहे. दुसरा वर्ग आर्थिकदृष्ट्या सुस्थितीतील अर्धवटरावांचा. या वर्गात दोन घटक आहेत. पहिला वैद्यकाचे जवळचे नातेवाईक, म्हणजे वैद्यकाचे आई वडील/ भाऊ- वहीण वगैरे. आपले कुटुंबीय डॉक्टर आहेत या अनुभवावर हा वर्ग वेलाशकपणे इतरांस काहीबाही औषधे सुचवत असतो, अशी मंडळी आसपास सहज दिसतील, यातील दुसरा घटक म्हणजे गुगलादी माध्यमांद्वारे स्वतःच संशोधन करून स्वतःच स्वतःला वा निकटवर्तीयांस औषधे सुचवणारा.

या वर्गाचा उच्छाद अलीकडे फारच वाढू लागलेला आहे. गूगल काय किंवा काही विख्यात रुग्णालयांच्या वेबसाइट्स काय, त्यात विविध आजारांसंबंधी लक्षणांच्या लसावि आधारे माहिती आणि क्वचित संभाव्य उपचार असतात. बऱ्याच आजारांची प्राथमिक लक्षणे सारखी आढळतात. पण त्याआधारे उपचार सुचवताना रुग्णाची शारीरिक स्थिती तपासणे महत्त्वाचे असते. या दोन्हींच्या आधारे मग औषध सुचवले जाते. पण गुगलवीर मात्र स्वतःच स्वतः काहीवाही घेत बसतात. महाजालातील फुकट्या माहितीच्या आधारे उपचार करता येत असते तर आज देशातील १३० कोटीतील किमान १०० कोटी स्वतः स वैद्यकच म्हणवते.

पण हेही कळण्याइतका विवेक या मंडळींच्या ठायी नसतो. म्हणून या वर्गाकडूनही औषधांचे दुरुपयोग मोठ्या प्रमाणावर होतात. ते होण्यास तिसरा कारणीभूत घटक म्हणजे खुद्द वैद्यकीय पेशा औषध निर्मात्या कंपन्या आणि वैद्यक यांचे साटेलोटे हे आधुनिक कालातील दुदैवी आणि उघड गुपित आहे. यातील पहिल्यास स्वतःची उत्पादने तेवढी विकण्यात रस आहे आणि वैद्यकांस आपली गुंतवणूक लवकरात लवकर दामदुप्पट मिळवणे महत्त्वाचे आहे. या क्षेत्रातील सर्वच वैराक असे आहेत असे अजिबातच नाही. पण औषधनिर्मात्या कंपन्यांशी हातमिळवणी करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे हे निश्चित, वैद्यकांस महागड्या, चैनीच्या वस्तूंच्या भेटी देण्यापासून सर्व सुखसोयी देऊ करणाऱ्या परदेशी सहलोपर्यंत अनेक आमिषे या कंपन्यांकडून दाखवली जातात, यामागील कारण एकच.

सदर वैद्यकाने आपल्या कंपनीच्या औषधाची शिफारस आपापल्या रुग्णांस करावी. याचा अर्थ असा की आपणास शिफारस केली जाणारी अनेक औषधे आपल्या शारीरिक गरजेपेक्षा वैद्यक आणि औषध कंपनीच्या आर्थिक निकडीवर आधारित असतात. यातूनच हृदयरुग्णांच्या रक्तवाहिन्या रुंदावण्यासाठी एका विशिष्ट कंपनीची धातूची रिंग (स्टेन्ट) वापरण्याचा गैरव्यवहार अनेकांस स्मरेल. वास्तविक त्यापेक्षा अन्य बनावटीची रिंग किती तरी स्वस्त होती. पण तरीही अनेक वैद्यकांकडून हा महागडा पर्याय निवडला गेला. हे असे पडद्याआडचे गैरव्यवहार रोखण्याची सोय आपल्याकडे नाही. तशी ती विकसित करण्यात सरकारलाही रस नाही. याचे कारण या अशा गैरव्यवस्था सर्वांच्या सोयीच्या असतात आणि त्यातून एकमेकांचे भले करण्याची संधी संबंधितांस मिळत असते. त्यामुळे उपचार आणि औषधातिरेक विनासायास सुरूच राहतात.

या तीन कारणांशिवाय या अशा औषधातिरेकाचे आणखी एक प्रबळ कारण आपल्याकडे आहे. प्राचीन औषधोपचार पद्धतीचे उदात्तीकरण हे ते कारण “अमुकतमुक औषध बेलाशक घ्या कारण त्याचे काहीही दुष्परिणाम (साइड इफेक्ट्स) नाहीत’ असा बिनडोक युक्तिवाद यासंदर्भात नेहमी कानावर येतो. तो करणाऱ्यांची संख्या सध्या वाढत असली तरी त्याच वेळी ‘प्रत्येक सुपरिणामास एक तरी दुष्परिणाम असणारच असणार हे साधे वैज्ञानिक तत्त्वही लक्षात न घेणाऱ्याची संख्या मात्र आटू लागली आहे. त्यात प्राचीन म्हणजे सर्वोत्तम असा एक समज. वास्तविक या प्राचीन ज्ञानाच्या आधारे वर्तमानातील औषधनिर्मिती वर्तमानाच्या गुणदोषांसहव होणार. म्हणजे एखादी वनस्पती एकेकाळी भले संजीवनी असेल. पण ती सध्या ज्या मातीत, वातावरणात आणि पाण्याच्या आधारे उभी आहे ते सर्व प्रदूषित वा कमअस्सल असेल तर त्या संजीवनीवरही त्याचा परिणाम होणारच. तेव्हा पुराणातील तिच्या कथित औषधी गुणांवर आताच्या काळात तसाच्या तसा विश्वास ठेवणे ही केवळ आणि केवळ अंधश्रद्धाच ती अधिकाधिक जोपासली जावी असाच प्रयत्न सांप्रतकाळी होत असून औषधेही त्यातून सुटत नाहीत. भरीला कोणतीही शास्त्रीय पाहणी नसताना कोणा बाबा / बापूच्या कसल्या तरी उत्पादनाची गुणवत्ता जाहीर करणारे आपले शासक! असे करणे एखाद्या देशात गुन्हा ठरले असते. पण आपल्याकडे दोनचार क्षीण विवेकाचे आवाज वगळले तर इतक्या गंभीर मुद्द्यावर तशी सार्वत्रिक शांतताच दिसून आली. अशा वेळी औषधांच्या अतिरेकाचे प्रमाण भारतात अधिक आढळत असेल तर त्यात आश्चर्य नाही. एकेकाळी आपल्या या सार्वजनिक अज्ञानामुळे औषध कंपन्यांची प्रयोगशाळा म्हणून भारताकडे पाहिले जात असे.

पहिल्या महायुद्धाच्या अखेरीस इंग्लंडच्या काही बलाढ्य कंपन्यांनी जेव्हा काही जीवघेणी रसायने तयार केली तेव्हा त्यांची चाचणी भारतात करण्याचा आदेश त्या देशाच्या सरकारने दिला. भारतात कोणाचे हकनाक प्राण गेले तरी त्याचा फार बना होत नाही हे त्यामागील कारण. अलीकडच्या काळात या रसायन कंपन्यांची जागा औषध कंपन्यांनी घेतली असावी. कोणत्याही आजारातून वरे होण्यास औषधाइतकीच त्या रुग्णाची बरे होण्याची मनोभूमिका महत्त्वाची असते.