Sanjay Raut is disgusted and frustrated - MLA Rana
राजकीय

संजय राऊत हे वैतागलेले आणि पिसाळलेले – आमदार राणा

अमरावती, 19 फेब्रुवारी : अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.’धनुष्यबाण’ हे पक्षचिन्ह आणि शिवसेना नाव एकनाथ शिंदे यांना देण्यासाठी सुमारे २ हजार कोटींचा सौदा झाला, असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला. राऊतांच्या या गौप्यस्फोटावर आमदार रवी राणा यांनी प्रतिक्रिया दिली.

यावेळी रवी राणांनी विविध घटनांचा उल्लेख करत उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. २ हजार कोटींच्या सौद्याबाबत विचारलं असताना रवी राणा म्हणाले, “संजय राऊत हे वैतागलेले आणि पिसाळलेले आहेत. यावर मी पुढे जास्त काही बोलणार नाही. कोण पिसाळतं? हे तुम्हाला माहीत आहे. हिंदुत्वाच्या विचारांवर शिवसेनेचे आमदार जेव्हा एकनाथ शिंदेंबरोबर गेले, तेव्हा राऊतांनी तुम्ही खोके घेतले, असा आरोप केला. पण आता सत्यमेव जयतेचा विजय झाला. निवडणूक आयोगानं बाळासाहेब ठाकरेंचा विचार असलेल्या एकनाथ शिंदे यांना धनुष्यबाण दिला आहे. बहुमताच्या आधारावर निवडणूक आयोगानं हा निकाल दिला. उद्या एकनाथ शिंदे यांना शिवसेना भवनही मिळेल,” अशी प्रतिक्रिया रवी राणांनी दिली.

रवी राणा पुढे म्हणाले, “खोक्यांचा आरोप करणारे आणि नेहमी आम्हाला नामर्द म्हणणाऱ्या संजय राऊतांना माझा प्रश्न आहे, जेव्हा उद्धव ठाकरे यांनी या महाराष्ट्रात शिवाजी महाराजांचे पुतळे काढण्याचे आदेश दिले. तेव्हा तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर शिवाजी महाराजांचे पुतळे काढले. तेव्हा तुमची मर्दानगी कुठे गेली होती? तेव्हा तुम्ही नामर्द झाले होते. मर्दानगीच्या गोष्टी करणाऱ्यांनी आपण मर्द आहात की नामर्द आहात, हे पहिल्यांदा तपासून बघावं.”

दरम्यान, रवी राणा यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं. “हनुमान चालीसा वाचली म्हणून तुम्ही एका महिला खासदाराला (नवनीत राणा) तुरुंगात टाकलं. तेव्हा उद्धव ठाकरेंसारखा नामर्द कसा झाला होता? त्यामुळे मर्दानगीच्या गोष्टी करणाऱ्यांनी आधी चेक करा तुम्ही मर्द आहात की नामर्द…” असा टीका रवी राणा यांनी केली.