बुलढाणा

बायकोने दुसरे लग्न केल्याने,नवऱ्याचे उपोषण!

बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा येथील प्रकार!

नांदुरा28 मे : नवरा  बायकोत होणारे भांडण हा काही नवा प्रकार नाही. परंतु नवऱ्याला न सांगतच दुसऱ्या व्यक्ती सोबत लग्न केल्यामुळे चक्क नवऱ्याने चक्क नांदुरा येथील तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.  घरात भांड्याला भांडे लागतातच पण म्हणून बायकोच्या विरोधात थेट कुणी उपोषणाला बसल्याचे तुम्ही पाहिले नसेल. मात्र, नांदुरा येथील एक नवरोबा चक्क बायकोने न सांगता दुसरे लग्न केले, म्हणून नवरोबा थेट नांदुरा तहसील कार्यलयासमोर उपोषणाला बसला आहे. अशी घटना बुलडाणा जिल्ह्यातील पहिली असल्याने सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे. नांदुरात महिलेने पतीला न सांगता दुसरे लग्न केले. त्यामुळं पतीनं पत्नीच्या विरोधात नांदुरा पोलिसात तक्रार दाखल केली. मात्र, पोलिसांनी पत्नीवर कोणतीही कारवाई न केल्याने पोलिसांच्या विरोधात नवरोबाने नांदुरा तहसीलदार कार्यलयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. सदर इसम पत्नीच्या विरोधात उपोषणाला बसल्यानंतर या घटनेच्या विषयाची चर्चा नांदुरात सुरू झाली आहे.नांदुरा तालुक्यातील राजनगर येथील गणेश मुरलीधर वडोदे यांचे लग्न झाडेगाव येथील एक तरुणीशी २०११ साली झाले होते. गणेश हे मोलमजुरी करून आपला संसाराचा गाडा सुखीसामाधाने चालवीत होते. आता घरसंसार म्हटला की भांड्याला भांडं लागतंच, थोडेफार वाद होतातच.या वादाचे रूपांतर चक्क टोकाची भूमिका घेईल असे गणेश यांना कधी वाटले नव्हते. डिसेंबर २०२० साली गणेश यांची पत्नी माहेरी रक्षाबंधनाला गेली. काही दिवस उलटून गेले,आता पत्नी येईल या आशेने गणेश वाट पाहत होता. मात्र, पत्नी काही परत आली नाही. त्यामुळे गणेश दररोज फोन करायला लागला, तेव्हा पत्नी फोन सुद्धा उचलत नव्हती. शेवटी वैतागून गणेश यांनी झाडेगाव गाठले व सासुरवाडीत आपल्या पत्नीची चौकशी करू लागला. तेव्हा पत्नी दिसून आली नाही.सासुरवाडीतील लोकांनी सांगितले की, तुझ्या पत्नीने दुसरे लग्न केले व ती नांदायला गेली आहे. हे ऐकून नवरोबा गणेशला धक्काच बसला. त्याने माझ्याशी घटस्फोट न घेता दुसऱ्याशी विवाह कसा केला ? असा सवाल करत तो नांदुरा गावात परत आला व थेट पोलीस स्टेशन गाठून बायको विरोधात तक्रार दिली. पोलिसांनी तक्रार घरून चौकशीसाठी ठेवले, त्यात कुठलीही कारवाई केली नाही.दरम्यान, पत्नीवर कारवाई करण्यासाठी गणेशने नांदुरा पोलीस स्टेशनच्या पायऱ्या झिझवल्या. मात्र, पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही. म्हणून गणेश वडते यांनी नांदुरा येथील तहसीलदार कार्यलयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. घटस्फोट न घेता पत्नीने दुसऱ्याशी लग्न केले हा गुन्हा असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.त्यामुळे पत्नीवर कायदेशीर कारवाई करावी,अशी मागणी नवरोबा गणेश वडते यांनी तहसीलदार यांच्याकडे केली आहे.जोपर्यंत पत्नीवर कारवाई होत नाही, तोपर्यंत आमरण उपोषण सोडणार नाही अशी भूमिका नवरोबा गणेश वडते यांनी घेतली आहे