crops-in-maharashtra
अकोला कृषी

जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान ; शेतकरी हवालदिल

अकोला: अवकाळी पावसाने नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात आसू पाहायला मिळत आहे. जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे फळबागांचे नुकसान झाले असून, शेतकरी हवालदिल झाला आहे. तातडीने पंचनामे करून भरीव मदत त्वरित न मिळाल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शेतकरी संघटनेने मंगळवारी दिला.

अवकाळी पावसाचा अकोला, तेल्हारा तालुक्यातील फळबागांना बसला आहे. जिल्ह्यात खरीप हंगामात प्रचंड पाऊस झाला होता. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना धोका दिला. सलग आठ दिवस झालेल्या पावसाने पीक वाया गेले. काही भागात जोरदार पाऊस झाल्याने सर्वच खरीप पिकांचे आतोनात नुकसान झाले.

खरीप हंगामातील हे नुकसान रब्बी हंगामात भरून निघेल अशी आशा असतानाच सोमवारी रात्री व मंगळवारीही अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. परिणामी रब्बी पिकांच्या रुपाने हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरीपणामुळे हिरावून गेला आहे. अकोट व तेल्हारा तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. परिणामी फळबागांचे नुकसान झाले आहे. संत्रा, गहूसह अन्य पिकांची हानी झाली आहे.

दरम्यान अस्मानीनंतर आता सुलतानी संकटही शेतकऱ्यांवर आले असल्याची टीका शेतकरी संघटेनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत कौठकर यांनी केली. सरकार गहू, कांदासह अन्य शेतमालाचे भाव नियंत्रित करीत आहे. परिणामी शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. पिक विमा मोबदल्याबाबत कंपनीच्या प्रतिनिधींशी संपर्क साधला असता त्यांनी मार्च महिन्यात होणाऱ्या नुकसानाबाबत शासन निर्णयात उल्लेख नसल्याचे सांगितले. सरकारने मदत न केल्यास शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशाराही काँठकर यांनी दिला.

जिल्ह्यात दि. ६ व ७ मार्च या कालावधीत झालेल्या पाऊस व वाऱ्यामुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक आपत्तीत तेल्हारा तालुक्यातील सात गावामध्ये हरभरा, गहू, कांदा या पिकांचे अंदाजे ११५ हेक्टरवरील शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. तसेच पातूर तालुक्यातील भंडारज बु. येथील अशोक तुकाराम इंगळे यांचे मालकीच्या १९० कोंबड्या मृत झाल्या आहेत, अशी माहिती नैसर्गिक आपत्ती कक्षातून प्राप्त झाली.