टीम, दैनिक राज्योन्नती
अलिबाग : कोर्लई येथील ठाकरे आणि वायकर कुटूंबियांच्या नावावर असलेल्या जागेतील १९ बंगल्यांच्या कथित घोटाळा प्रकरणी अखेर रेवंदडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट कागदपत्र तयार करून शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी सहा जणांविरोधात हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यात कोर्लई ग्रामपंचायतीचे तत्कालिन ग्रामसेवक, सरपंच आणि सदस्यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली होती.
भादवी कलम ४२०, ४६५, ४६६, ४६८ आणि ३४ अन्वये मुरुडच्या ग्राम विकास अधिकारी संगिता भांगरे यांनी याबाबतची तक्रार नोंदविली आहे. ग्रामसेवक विनोद मिंडे, देवंगणा वेटकोळी, देविका म्हात्रे, गोविंद चंदर वाघमारे, रेश्मा रमेश मिसाळ, रेमा रमेश पिटकर आणि प्रशांत जानू मिसाळ अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस निरीक्षक देविदास मुपडे या प्रकरणाचा पुढील तयार करत आहेत.
माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे व मनीषा रवींद्र वायकर यांच्या नावे मुरूड तालुक्यातील कोर्लई येथे असलेल्या जमीन खरेदी केली होती. त्यावर १९ बंगले होते. याची नोंद रद्द करण्यात आली आहे. २०१४ साली रश्मी ठाकरे व मनीषा रवींद्र वायकर यांनी कै. अन्वय नाईक यांच्याकडून कोर्लई येथील जागा त्यावरील बांधकांमासह विकत घेतली होती. या जागेवर १९ बंगले असल्याची नोंद ग्रामपंचायत कार्यालयात होती. कै. अन्वय नाईक या घरांची घरपट्टी भरत होते. हे बंगले ठाकरे – वायकर यांच्या नावे करावेत यासाठी पाठपूरावा देखील करण्यात आला. ही घरे ठाकरे – वायकर यांच्या नावे देखील झाली होती. त्यांची घरपट्टीही ते भरत होते. नंतर मात्र हे प्रकरण अडचणीचे ठरू शकते लक्षात आल्यावर उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी दबाव टाकून २०२२ मध्ये कागदपत्रामंध्ये फेरफार करून बनावट कागदपत्रांच्या आधारे या घरांची नोंदणी रद्द करून घेतली, आणि बंगले जमिनदोस्त केले असा आरोप डॉ. किरीट सोमैया यांनी केला होता. सोमय्या यांच्या पाठपुराव्यानंतर अखेर काल रात्री हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.