ulhasnagar-municipal-corporation
महाराष्ट्र

उल्हासनगरच्या विकासकामांसाठी राज्यसरकारची, ४७ कोटी ५० लाख रुपयांच्या निधीला मंजुरी 

मुंबई : राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडून उल्हासनगर शहरातील विविध विकासकामांसाठी ४७ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी हि माहिती दिली.

गेल्या काही महिन्यात खासदार डॉ. शिंदे यांनी पाणी पुरवठा, स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन यांसह रस्ते प्रकल्पांनाही प्राधान्य दिले आहे. या कामांसाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कोट्यावधी रूपयांचा निधीही उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तसेच अंबरनाथ शहरातील शिवमंदिर परिसर सुशोभीकरण, ग्रामीण भागातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी जलजीवन मिशन यांसारख्या योजना राबविण्यात येत आहे. यातील बहुतांश कामे प्रगतीपथावर आहे. या कामांबरोबरच आता उल्हासनगरमध्येही विविध विकासकामांना गती मिळणार आहे.

नव्या निधीतून हि कामे होणार …

नव्याने उपलब्ध झालेल्या निधीतून उल्हासनगर शहरात सार्वजनिक शौचालय उभारणे, महिलासांठी स्वतंत्र शौचालय, नाल्यांचीउभारणी करणे, गटार बांधणे, संरक्षण भिंत उभारणे, रस्त्यांचे काँक्रीटीकरण करणे, नवीन रस्ते उभारणी, फुटपाथ तयार करणे, समाजमंदिर तयार करणे, अभ्यासिका, बगीचा उभारणे, आरोग्य केंद्र, जॉगिंग ट्रॅक, बाकडे बसविणे, विद्युत दिवे बसविणे, पत्र्यांचे शेड उभारणे, कल्व्हर्ट दुरुस्ती करणे, पायवाट, ड्रेनेजचे काम, सुशोभीकरण, बुध्दविहार उभारणे, पाईपलाईन टाकणे, सभामंडप उभारणे, कुंपणउभारणे, साकव बांधणे, सुविधा आणि साधनसामग्री युक्त व्यायामशाळा उभारणे, शहरांतील दिशा दर्शक फलक उभारणे, जुन्या दिशादर्शकांचे सुशोभीकरण करणे यांसारखी कामे होणार आहे.