doordarshan
संपादकीय

संपादकीय : आजच्या माध्यमातून

आपल्या घरात पहिल्यांदा चित्रवाणी संच- अर्थात टीव्ही- कधी आला, हे चाळिशी-पन्नाशी ओलांडलेल्या प्रत्येक व्यक्तीला आजही हमखास आठवत असेल. तेव्हा आपण किती वर्षांचे होतो, कितवीत होतो, तेव्हा कार्यक्रम कोणते होते.. असे ‘तेव्हा’चे अनेक तपशीलही आठवत असतील यापैकी बर्‍याच जणांना. ते साहजिक. कारण मुळात चित्रवाणी या माध्यमाशी प्रेक्षकांचे नातेच वैयक्तिक किंवा कौटुंबिक. बाकी भारतात ‘दूरदर्शन’ या पहिल्या चित्रवाणी सेवेची स्थापना १५ सप्टेंबर १९५१ आणि मुंबई दूरदर्शन केंद्राची सुरुवात २ ऑक्टोबर १९७२, या तारखा एरवी कुणाला आठवणारही नाहीत..

‘मुंबई दूरदर्शन केंद्राच्या स्थापनेचे सुवर्णमहोत्सवी वर्ष’ म्हणून यंदा या तारखेकडे लक्ष जाईल इतकेच. या सुवर्णमहोत्सवी वर्षांरंभाचे औचित्य साधून मुंबई दूरदर्शनच्या आठवणी जागवणारे ध्वनिचित्रमय संदेश व्हॉट्सअ‍ॅप या आजच्या माध्यमातून काहींकडे एव्हाना पोहोचलेही असतील. या निमित्ताने अनेक जण स्मरणरंजनाच्या कुप्या उघडतील. १९७४ सालच्या भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी क्रिकेट सामन्याचे प्रक्षेपण आम्ही चारआठ आण्याचे तिकीट काढून टीव्हीवर पाहिलेले आहेत, असे सांगणार्‍यांची कुपी अर्थातच मोठी! त्यापेक्षा कमी आकाराची कुपी त्या वेळी बाळगोपाळ म्हणून गल्लीतल्या- किंवा पलीकडल्या गल्लीतल्या टीव्हीवाल्या घरात जाऊन ‘किलबिल’ या मुलांसाठीच्या मराठी कार्यक्रमाप्रमाणेच ‘संताकुकडी’ हा गुजराती बालकांचा कार्यक्रमही विस्फारल्या डोळ्यांनी पाहिलेल्यांची.. त्याहीपेक्षा लहान कुपी ‘हम लोग’पासूनच आठवणी सुरू होणार्‍यांची! कुप्यांमध्ये हा तरतमभाव असला तरी तो तपशिलांच्या आकारांपुरताच. बाकी प्रत्येक कुपीतला दरवळ मात्र सारखाच.

doordarshan-old-serials

हे असे का होते? ‘मुंबई दूरदर्शन’ असे नुसते शब्द उच्चारताच गजरा, छायागीत, फूल खिले है गुलशन गुलशन, सुंदर माझं घर, प्रतिभा आणि प्रतिमा, चिमणरावांचे चर्‍हाट, याकूब सईदबबन प्रभू या भन्नाट दुकलीचा ‘हास परिहास’ आणि अगदी साप्ताहिकी, उद्याचे कार्यक्रम, आपण यांना पाहिलंत का.. हे सारे त्या कुप्यांमधून आजही कसे काय दरवळते? कसला असतो हा दरवळ?बहुधा आपल्याच तत्कालीन निरागसपणाचा. या निरागसपणाचा प्रेक्षकाच्या वयाशी काहीही संबंध नसे. घरची मोठी माणसेसुद्धा ‘दूरदर्शन’चे प्रेक्षक म्हणून बहुतेकदा निरागसच असायची.

वृत्तनिवेदक तेव्हा बातम्या वाचायचे, खाली मान घालून. मान वर व्हायची ती वाक्याच्या पूर्णविरामानंतर. ‘मोऽठी बातमीऐऽऽ’ म्हणून कुणी छाकटे तेव्हा आरडाओरड करीत नसत, तरीही तेव्हाची पोक्त माणसे दूरदर्शनच्या बातम्या निमूटपणे ऐकत. मुंबई दूरदर्शनचा हा सारा प्रेक्षकवर्ग संस्काराने मध्यमवर्गीय होता आणि ‘पानात पडेल ते खायचे’ या संस्काराचाच पुढला भाग, ‘मुंबई दूरदर्शन दाखवेल ते बघायचे’ हाही होता! बॉबी ते शोले या चित्रपटांना तडाखेबंद यश मिळत असतानाही मुंबई दूरदर्शनचा प्रेक्षकवर्ग किंवा आजच्या भाषेत ‘टीआरपी’ वाढत होता, तो यामुळेच. तत्कालीन मराठी घरांमध्ये केवळ टीव्ही नवा आहे म्हणून ‘आवो मारी साथे’ किंवा ‘घेर बेठां’ आदी गुजराती कार्यक्रम पाहिले जात असल्याचे त्या कुणा मार्शल मॅक्लुहानला समजले असते, तर ‘माध्यम हाच संदेश’ या त्याच्या सिद्धान्ताची इतकी जिवंत सिद्धता पाहून तो ढसढसा रडलाच असता बहुधा! पर्याय नव्हता म्हणून लाइफबॉय साबण, विम्को काडेपेटय़ा अशा अनेक गोष्टी घरोघरी वापरल्या जात; त्याच मानसिकतेतून ‘मुंबई दूरदर्शन’चे सर्वच्या सर्व कार्यक्रम गोड मानले गेले असावेत.

doordarshan-old-serials1

हळूहळू सार्‍यांनाच कळू लागले की, चित्रपटाधारित हिंदूी कार्यक्रम किंवा मराठी नाटयक़लावंतांचा सहभाग असलेले निखळ मनोरंजनाचे कार्यक्रम आपल्याला अधिक आवडतात! मुळात भारतासारख्या विकसनशील देशात चित्रवाणीची सुरुवात लोकजागृतीच्या उद्देशाने झाली होती, त्यासाठी बनवले गेलेले ज्ञानदीप, कामगारविश्व, आमची माती आमची माणसं, हे कार्यक्रम जरी पाहिले जात असले तरी टिंगलीचा विषय ठरू लागले. वास्तविक याच सुमारास ‘रजनीगंधा’, ‘छोटी सी बात’ हे बासु चटर्जीचे चित्रपट यशस्वी ठरत होते.. प्रेक्षकांना जणू आपल्याच गोष्टी सांगणारे मनोरंजन कसे हवे असते, ‘कौटुंबिक मनोरंजन’ हे कथेला कुटुंबातच बंदिस्त न करताही कसे देता येते, याचा वस्तुपाठच हे चित्रपट ‘मुंबई दूरदर्शन’ला घालून देत होते.

bollywood-old-movie

पण चित्रपट हे शनिवार-रविवारी निम्म्याअधिक कर्मचार्‍यांना सुट्टी देण्याचे साधन मानणार्‍या मुंबई दूरदर्शनने बासुदांच्या चित्रपटांतून एकलव्यासारखे दुरून शिक्षण काही घेतले नाही. मग खुद्द बासु चटर्जीनीच १९८६ मध्ये ग्राहक संरक्षण विभागाच्या अर्थसाह्य़ातून याच मुंबई दूरदर्शनसाठी ‘रजनी’ ही मालिका घडवली, त्यातील प्रिया तेंडुलकरने प्रेक्षकांची मने जिंकतानाच ग्राहक म्हणून जागरूक राहण्याची उमेद त्यांना दिली, तेव्हा कुठे रंजन आणि ज्ञानाचा समसमा संयोग दिसला! मुंबई हे बहुभाषक महानगर, त्यातील नाटय़सृष्टी, साहित्यविश्व यांत मराठीचा दबदबा असला तरी इंग्रजी, हिंदी, गुजराती अशी उपविश्वे सुखेनैव वाढत असण्याचा तो काळ.

त्यामुळे मुंबई दूरदर्शनचे भलेच झाले. एकतर नाटय़सृष्टीने अनेक चेहरे दिले. भक्ती बर्वे तर होत्याच पण विश्वास मेहेंदळे, विनय आपटे होते आणि डॉली ठाकोर, सबीरा मर्चंटही होत्या. स्मिता तळवलकर आणि स्मिता पाटील या दोन्ही स्मितांचा प्रवास मुंबई दूरदर्शनच्या निवेदिका नि मग चित्रपट असा झाला. हिंदीत ‘परिक्रमा’मध्ये कमलेश्वर, तर ‘बज्म्मे उर्दू’ किंवा ‘महफिल ए याराँ’सारख्या उर्दू कार्यक्रमांत अली सरदार जाप्रâी असायचे, प्रतिभा आणि प्रतिमामध्ये अशोक दा. रानडे, वसंत बापट, सई परांजपे अशा अनेकांची मांदियाळीच. ‘नाटय़ावलोकन’वाले सुरेश खरे स्वत: नाटककार.. पुढे ‘रानजाई’मध्ये तर शान्ता शेळके आणि सरोजिनी बाबर यांचा समृद्ध संस्कृतिसंवाद.. ही यादी अपुरीच ठरेल, इतके प्रतिभावंत लोक मुंबई दूरदर्शनवर हजेरी लावत, गुणग्राहकपणा म्हणजे काय, हे या केंद्रातले धुरीण सरकारी नोकर असूनही त्यांना माहीत होते, त्यामुळे निर्मात्यांना स्वातंत्र्य मिळे.सरकारी उपक्रमांमधली स्वायत्तता हळूहळू हरवणे हा १९७० व ८०च्या दशकांत घडलेला एकमेव बदल नव्हे.

मध्यमवर्गही त्या दशकांपासून बदलू लागलाच आणि घरातल्या लाइफबॉयच्या जागी लक्स, संतूर ते अगदी ‘अ?ॅरामस्क’सारख्या इंटुक नावांचे साबण दिसू लागले, काडेपेटय़ा ‘शिप’च्या झाल्या, टीव्हीही रंगीत झाला आणि मग दिल्लीच्या ‘राष्ट्रीय प्रसारणा’चाच दबदबा वाढला, खासगी वाहिन्यांचा प्रवेश १९९०च्या दशकात झाल्यानंतर तर ‘टीआरपी वाढवा’चा धोषा दूरदर्शनच्या अधिकार्‍यांनीही लावला.. यापैकी रतिकांत बसू हे काल ‘दूरदर्शन’चे प्रमुख आणि उद्याच एका खासगी वाहिनीचे बॉसहा ‘नैतिक’ बदलसुद्धा घडला किंवा पिझ्झा जिथे मिळतो तो भाग प्रगत असले समज रूढ होऊ लागल.