देश राजकीय

तेलंगणाच्या मुख्यमंत्रीपदी रेवंत रेड्डी विराजमान; सोनिया गांधीसह काँग्रेस पक्षश्रेष्ठी शपथविधी सोहळ्याला उपस्थित

७ डिसेंबर मुंबई: तेलंगणाच्या मुख्यमंत्री पदी रेवंत रेड्डी विराजमान झाले आहेत. तेलंगणातील हैदराबाद येथील एलबी स्टेडियमवर आयोजित करण्यात आलेल्या शपथविधी कार्यक्रमात काँग्रेस नेते रेवंत रेड्डी यांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली.

तेलंगणाचे राज्यपाल टी सुंदरराजन यांनी काँग्रेस नेते रेवंत रेड्डी यांना मुख्यमंत्री पदाची शपथ दिली. तेलंगणाच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी शिवकुमार यांच्यासह अनेक काँग्रेस नेते उपस्थित होते. रेवंत रेड्डी हे तेलंगणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत.

रेवंत रेड्डी तेलंगणाचे दुसरे मुख्यमंत्री असतील. २०१३ मध्ये तेलंगणाच्या स्थापनेनंतर काँग्रेस पहिल्यांदाच सत्तेत आली आहे. आतापर्यंत केवळ चंद्रशेखर राव दोनदा मुख्यमंत्री झाले होते. मात्र, यावेळी त्याना हॅट्ट्रिक करण्यात अपयश आलं. रेवंत रेड्डींनी चंद्रशेखर रावांचं स्वप्न धुळीला मिळवलं आणि काँग्रेसकडे सत्ता खेचून आणली.

५६ वर्षीय रेवंत रेड्डी यांनी एलबी स्टेडियममध्ये मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शपथविधी कार्यक्रमात सुमारे एक लाख लोक सहभागी झाले होते. शपथ घेण्यापूर्वी रेवंत रेड्डी सोनिया गांधींसोबत खुल्या जीपमधून स्टेडियमवर पोहोचलेतेलंगणामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं दणदणीत विजय मिळवला आहे. पक्षानं ११९ पैकी ६४ जागा जिंकत बहुमत मिळवलं. तर बीआरएसला केवळ ३९ जागांवरच विजय मिळवता आल्या. भाजपनं तेलंगणात केवळ ८ जागाच जिंकल्या आहेत.

कर्नाटकानंतर तेलंगणा हे दक्षिणेतील दुसरं राज्य आहे, जिथे काँग्रेसनं स्वतःचं सरकार स्थापन केलं आहे. तामिळनाडूमध्ये काँग्रेस द्रमुकसोबत आघाडी सरकारमध्ये आहेत. तेलंगणातील विजयाचं श्रेय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रेवंत रेड्डी यांना जातं. सुरुवातीपासूनच ते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आघाडीवर होते.

अखेर मंगळवारी पक्षाने त्यांच्या नावाला अधिकृत मान्यता दिली आणि आज रेवंत रेड्डी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. रेवंत रेड्डी यांचा जन्म १९६९ मध्ये अविभाजित आंध्र प्रदेशातील महबूबनगर येथे झाला. रेड्डी यांनी विद्यार्थी राजकारणाची सुरुवात अभाविपपासून केली होती. नंतर त्यांनी चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पक्षात प्रवेश केला.

२००९ मध्ये ते टीडीपीच्या तिकिटावर आंध्रमधील कोडंगलमधून आमदार म्हणून निवडून आले. २०१४ मध्ये ते तेलंगणा विधानसभेत टीडीपीचे सभागृह नेते म्हणून निवडले गेले.रेवंत रेड्डी यांनी २०१७ मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

मात्र, २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. तथापि, काँग्रेसने त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना मलकाजगिरीतून तिकीट दिले, ज्यामध्ये ते विजयी झाले. २०२१ मध्ये काँग्रेसने त्यांना मोठी जबाबदारी दिली आणि प्रदेशाध्यक्ष केलं.