राजकीय

आता गनिमी काव्याने सरकारच्या, बुडाखाली आग लावू – तुपकर

बुलढाणा :-सोयाबीन, कापूस उत्पादकांचा प्रश्न सरकारने १५ डिसेंबरपर्यंत सोडवला नाही, तर त्यानंतर आंदोलन हे सरकारच्या पायाखालची वाळू सरकावणारं असेल. आता आम्ही काय करणार आहे, हे सांगणार नाही.छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमा कावा वापरू. पण, सरकारच्या बुडाखाली आग लावल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही,असा इशारा शेतकरी रविकांत तुपकर यांनी सरकारला पुन्हा दिला.

सोयाबीन,कापूस उत्पादकांच्या प्रश्नावर शेतकरीनेते रविकांत तुपकर यांनी बुलडाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्यातील सोमटाणा आंदोलन केले होते. त्यानंतर तुपकर मुंबईत गेले होते. त्या ठिकाणी त्यांना सरकारने चर्चेसाठी बोलावले. मुंबईत आल्यानंतर तुपकर यांनी आज सोमटाणा येथे येऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी सरकारला इशारा दिला.चिखली तालुक्यातील सोमटाणा गावाने सोयाबीन, कापूस उत्पादकांच्या प्रश्नावर उभारलेल्या आंदोलनाला प्रचंड पाठबळ दिलं. या गावच्या पाठबळाच्या जोरावरच हे आंदोलन इतक्या ताकदीनं मोठं झालं. सरकारला आमच्या मागणीपुढे झुकावं लागलं आणि त्यांनी आम्हाला चर्चेला बोलावलं, असेही तुपकर यांनी स्पष्ट केले.ते म्हणाले की, सोमटाणा गाव हे सोयाबीन, कापूस आंदोलनाचे केंद्रबिंदू झालं आहे. भविष्यातही ते शेतकरी आंदोलनाचे केंद्रबिंदू असेल, असा निर्णय आज आम्ही गावकऱ्यांशी चर्चा करून घेतला आहे. सोयाबीन, कापूस आंदोलनाच्या संदर्भात जी काही दिशा ठरेल ती याच गावातून ठरेल आणि जो काही निर्णय होईल, तो सोमटाणा गावातच होईल.या गावाने माझ्यावर आणि माझ्या सहकाऱ्यांवर प्रचंड प्रेम केलेले आहे. येथील गावकऱ्यांनी आंदोलनासाठी निधी गोळा केला. एक रुपयासुद्धा येथील गावकऱ्यांनी आम्हा खर्च करू दिला नाही, त्यामुळे त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज मी सोमटाणा गावात आलो होतो, असेही त्यांनी स्पष्ट केले

आम्ही निम्मी लढाई जिंकली आहे – तुपकर

आम्ही आज अर्धी लढाई जिंकली आहे. जे सरकार आम्हाला चर्चेला बोलावत नव्हतं. आम्ही मुंबईला गेलो, तेथील आंदोलनात सुद्धा सोमटाणा गावाचाच सिंहाचा वाटा होता. शेवटी सरकार झुकलं. सरकारला आम्हाला चर्चेला बोलवावं लागलं. आमच्या ७० टक्के मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. त्याच्या अंमलबजावणीसाठी सरकारने पंधरा दिवस ते महिनाभराचा अवधी मागितला आहे. आम्ही पंधरा डिसेंबरपर्यंत वाट बघू. पंधरा डिसेंबरनंतरचे आंदोलन हे सरकारच्या पायाखालची वाळू सरकावणारं असेल, असेही तुपकर यांनी नमूद केले.