अकोला कृषी

अकोला जिल्ह्यत कांदा लिंबु प्रक्रिया प्रकल्प उभारण्या करीता मुख्यमंत्र्यांना डॉ .मिलिंद पवार यांचे निवेदन

अकोला: अकोला शहराच्या दक्षिण दिशेला (ता. बाळापुर ) शहरापासुन अंदाजे अठ्ठावीस किलोमीटर अंतरावर हैद्राबाद हायवेच्या जवळ वाडेगाव हे गाव असुन ते लिंबु उत्पादना साठी प्रसिद्ध आहे. तसेच आजुबाजुच्या पंचक्रोशीत निरनिराळ्या लिंबु फळाचे मुबलक प्रमाणात उत्पादन होते. येथील लिंबु महाराष्ट्रा व्यतिरिक्त दिल्ली – गौहाटी पर्यंत विकल्या जाते.

काही उत्पादकाच्या मते इथले लिंबु परदेशातही पाठविले जातात. लिंबु फळाच्या व्यापारा करीता ‘विदेर्भाची बार्डोली ‘म्हणुन या वाडेगाव ची महती आहे. लिंबु फळ आणि त्यापासुन निर्माण होणारी उत्पादने आरोग्यदृष्ट्या शरीरासाठी अत्यावश्यक भाग आहे. लिंबु वा त्यापासुन निर्माण होणारी जवळ जवळ पस्तीस प्रकारची उत्पादने आहेत आणि त्याची मागणी आज आणि भविष्यातही वाढतच राहणार आहे. विदर्भ आणि जिल्ह्यातील दुसरे महत्वाचे पीक आणि उत्पादन म्हणजे कांदा. अकोला जिल्हा आणि बाजुचे चार जिल्हे पकडुन सुद्धा कांद्याचे पीक भरघोस प्रमाणात येते.

कांदा उत्पादन कमी झाले की नागरिकांच्या आणि जास्त झाले की शेतकर्‍यांच्या डोळ्यात पाणी येते, हा वर्षानुवर्षांचा अनुभव आहे. कांदा शेतकर्‍याच्या शेतातुन जास्तीतजास्त दोन रुपये दराने जागेवरून विकल्या जातो तोच कांदा व्यापारी साठेबाजी करुन ग्राहकांना चाळीस रुपये दराने विकतात. बरेच वेळा उत्पादनाचा खर्चही निघत नसल्याने कांदा एक तर जनावरांना खाऊ घालावा लागतो किंवा फेकून द्यावा लागतो.

कांद्याची सुद्धा चाळीस ते पन्नास उत्पादने आहेत आणि त्यांची दिवसेंदिवस मागणी वाढतच राहणार. अशी वर्षानुवर्षांपासून परिस्थिती असताना कोणत्याही शासनाला आणि राजकीय नेत्याला अशा बाबीचा विचार करण्याची गरज भासली नाही हे विदेर्भ वासियांचे दुर्दैवच म्हणावे लागेल.आज पर्यंत विदर्भातील फक्त राजकीय नेत्यांचाच विकास झाला नागरिक मात्र हवालदिलच राहिले संबंधित लिंबु आणि कांदा प्रक्रिया प्रकल्प विदर्भाची गरज आहे यातुन शेतकर्‍यांना शेतीमालाचा योग्य आर्थिक मोबदला मिळुन विदर्भातील नागरिकांना काही प्रमाणात रोजगार उपलब्ध होण्यास निश्चित मदत होईल.

मा पंतप्रधान मोदीजी स्टर्टअप च्या माध्यमातुन देश मोठा करण्याची स्वप्ने दाखवत आहेत त्याचीच सुरवात समजुन सदर प्रकल्प विदर्भात युद्धपातळीवर सुरु करावा अशा मागणीचे निवेदन जिल्हा काँग्रेस कमिटी डॉक्टर सेल चे जिल्हाध्यक्ष डॉ मिलिंद पवार यांनी जिल्हाधिकार्‍यांन मार्फत मा मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांना दिले.