अकोला

H3N2 वर औषधे उपलब्ध नाही; आरोग्य मंत्र्यांचे आवाहन

अकोला : महाराष्ट्रातही H3N2 फ्लूच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. सर्दी, खोकला आणि तापामुळे रुग्णालयात दाखल होणार्‍या रुग्णांची संख्या वाढत आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत इन्फ्लूएंझाच्या ३६१ रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबई, नागपूर, पुणे, औरंगाबाद, ठाणे, सांगली आणि कोल्हापूर येथे H3N2 इन्फ्लूएंझा रुग्णांची नोंद झाली आहे.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर राज्य सरकार सतर्क झालं आहे. H3N2 वर औषधं उपलब्ध नसल्याने नागरिकांनी योग्य ती काळजी घ्या, असं आवाहन राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी केलं आहे.राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी म्हटलं आहे की, महाराष्ट्रात H3N2 इनफ्लूएंझा झपाट्याने पसरत आहे, मात्र नागरिकांनी घाबरुन जाऊ नका. विनाकारण गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा, मास्क वापरा आणि सामाजिक अंतर राखा असं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केलं आहे.

महाराष्ट्रात H3N2 सह कोविडच्या रुग्णांमध्ये पुन्हा वाढ होत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे आरोग्य प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. H3N2 इनफ्लूएंझा आणि कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे आरोग्य प्रशासन अलर्टवर आहे. या सर्व प्रकरणांवर सरकार बारकाईने लक्ष ठेवून असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे. तसेच सर्व रुग्णालयांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.

या पार्श्वभूमीवर गुरुवारी आरोग्य विभागाची बैठक पार पडली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सांगितलं की, H3N2 इनफ्लूएंझा या आजारावर औषधं उपलब्ध नाही. मात्र वेळीच फ्लूवरील उपचार घेतल्यास हा संसर्ग बरा होऊ शकतो. खासगी आणि सरकारी रुग्णालयांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सध्या हवामानात मोठा बदल होत असून, ही चिंतेची बाब आहे. त्याचा आरोग्यावर परिणाम होत आहे. यासाठी लोकांना मास्क वापरणे, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा, हात धुणं आणि योग्य सामाजिक अंतर राखण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. सर्दी, तापाची लक्षणे दिसल्यास लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्या, असं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केलं आहे.

H3N2 व्हायरल विषाणूमुळे महाराष्ट्रात दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील इनफ्लूएंझाचा पहिला बळी कर्नाटकमध्ये झाला होता. त्यानंतर दुसरा मृत्यू हरियाणामध्ये झाला. दोन दिवसांपूर्वी गुजरातमध्येही या व्हायरल फ्लूने एका रुग्णाने प्राण गमावले आहेत. आता देशातील इनफ्लूएंझा संसर्गाच्या मृत्यूची संख्या दहा झाली आहे.