मुंबई

२ जानेवारीला  होणारी एमपीएससीची पूर्व परीक्षा लांबणीवर!

मुंबई, २८ डिसेंबर: २ जानेवारी रोजी होणारी एमपीएससीची पूर्वपरीक्षा पुढे  ढकलण्यात आली आहे.त्यामुळे राज्य सेवा आयोगाची परीक्षा देणाऱ्या उमेदवारांमध्ये नाराजी पसरली आहे.

ही परीक्षा २ जानेवारी २०२२ रोजी होणार होती. सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. करोना काळात शासकीय सेवांमधील भरतीसाठी परीक्षा न झाल्यामुळे अधिकाधिक उमेदवारांना संधी मिळावी म्हणून परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली आहे.

परीक्षेसाठी राज्य सरकारतर्फे अलीकडेच जाहीर करण्यात आलेल्या वाढीव वयोमर्यादेनुसार, जे उमेदवार परीक्षा देण्यासाठी पात्र ठरले आहेत आणि त्यांनी अर्ज भरलेला नाही असे उमेदवार पूर्व परीक्षेसाठी १ जानेवारीपर्यंत अर्ज करू शकणार आहेत.कोविड १९ महामारी संक्रमणामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा २०२१ या वर्षात होऊ शकली नाही.

परिणामी ज्या उमेदवारांची वयोमर्यादेनुसार संधी या वर्षी संपली, त्यांचे नुकसान होत होते. परिणामी राज्य सरकारने या उमेदवारांना आणखी एक संधी देण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भातील घोषणा नुकतीच केली होती.

परिणामी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला परीक्षा प्रक्रिया नव्याने राबवावी लागणार आहे.पोलीस उपअधीक्षक, उपजिल्हाधिकारी , तहसीलदार अशा ३९० पदांच्या भरतीसाठी ही परीक्षा घेण्यात येणार होती. आता वयोमर्यादेनुसार ज्यांची परीक्षा देण्याची संधी २०२१ मध्ये संपत होती, असे उमेदवार या परीक्षेसाठी नव्याने अर्ज करू शकणार आहेत.

हे अर्ज करण्याची मुदत २८ डिसेंबर ते १ जानेवारी आहे.हे उमेदवार करू शकणार अर्ज? ज्या उमेदवारांनी १ मार्च २०२० ते १७ डिसेंबर २०२१ या कालावधीत कमाल वयोमर्यादा ओलांडली असेल अशा उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आणखी एक संधी मिळाली आहे.

असे उमेदवार १ जानेवारी २०२२ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकणार आहेत. भारतीय स्टेट बँकेत चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याची मुदत ३ जानेवारी २०२२ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.