holi-celebration
अकोला

होळी सणावर महागाईचा भस्मासूर

पिचकारी, रंग, गुलालाच्या दरात ३० टक्क्यांनी वाढ, खरेदीदारांमध्ये निरुत्साह

अकोला : रंगांचा सण ‘होळी’ला अवघे काही दिवस उरले आहेत. होळीच्या पार्श्वभूमीवर शहरातील दुकानदारांनी आपापली दुकाने साहित्याने भरली आहेत. मात्र, मागील वर्षीच्या तुलनेत यंदा रंग, पिचकारी, गुलाल आदींच्या किमती २० ते ३० टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्यामुळे बाजारामध्ये खरेदीदारांचा निरुत्साह दिसून येत आहे.

शहरातील गोल बाजारातील पिचकारी, रंग, गुलाल घाऊक विक्रेत्यांची दुकाने सजली आहेत. येथे होळीचे साहित्य नागपूर व दिल्लीतून येते. यंदाच्या उत्सवात चांगला व्यवसाय होईल या आशेने छोट्या व्यावसायिकांनी होळीचे सर्व सामान दुकानात भरले. मात्र, बाजारात खरेदीदारांमध्ये उत्साह दिसून आला नाही. माईक बूमप्रमाणे दिसणारी खास पिचकारी बाजारात दाखल झाली आहे.

यावर्षी पहिल्यांदाच ही पिचकारी दाखल झाल्याने या पिचकारीला मोठी मागणी आहे. याशिवाय पिचकरीचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. लहानांपासून मोठ्यांना भुरळ घालतील अशा अनेक प्रकारच्या पिचकारी उपलब्ध आहेत. पिचकारीची किंमत २५ ते ५५० रुपयांपर्यंत आहे. होळीला आठवडा उरला असल्याने व्यवसायात सुधारणा होईल, असा विश्वास विक्रेत्यांनी व्यक्त केला आहे.

बाजारात लाल, हिरवा, निळा, पिवळा गुलाल नेहमीच विकला जातो. यावेळी बाजारात नवीन रंगीत गुलाल उपलब्ध आहेत. जांभळे, केशरी, धानी आदी रंगीत गुलालही आले आहेत. आता ग्राहक नवीन रंगाच्या गुलालाची मागणी करत असल्याचे विक्रेते सांगतात. त्यांची मागणी लक्षात घेऊन नवीन रंगीत गुलाल मागविण्यात आला आहे. त्वचेला हानिकारक गुलाल अनेकजण टाळत आहेत. अशा लोकांसाठी हर्बल गुलालही बाजारात उपलब्ध आहे.