मुंबई: सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये छत्तीसगडमध्ये चकमक झाल्याचे वृत्त समोर आले आहे. छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात ही चकमक झाली दरम्यान, सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यामध्ये झालेल्या या चकमकीत तीन डीआरजी पोलीस अधिकारी शहीद झाले आहेत.
यामध्ये एएसआय रामुराम नाग, सहाय्यक हवालदार कुंजम जोगा आणि हवालदार वंजाम भीमा अशी शहीद झालेल्या पोलीस अधिकांर्यांची नावे आहेत.सर्व पोलीस गस्तीसाठी जात होते. त्यावेळी सुकमा जिल्ह्यातील जगरगुंडा पोलीस स्टेशन परिसरात नक्षलवाद्यांनी अचानक जवानांवर गोळीबार केला. यात तीन डीआरजी अधिकारी शहीद झाले असून, दोन जवान जखमी झाल्याचे सांगितले जात आहे.
गडचिरोली : जहाल नक्षलवाद्याला ठोकल्या बेड्या
गडचिरोली पोलिसांनी उत्तम कामगिरी करत एका जहाल नक्षलवाद्याला अटक केली आहे. अटक करण्यात आलेला नक्षलवादी हा छत्तीसगडचा रहिवासीअसून वेल्ला केसे वेलादी ( वय, ३५ ) त्याचे नाव आहे. गडचिरोली पोलिसांनी दामरंच्या जंगल परिसरात विशेष अभियान राबवून ही कारवाई केली आहे.
२००१ मध्ये तो नक्षल दलममध्ये भरती झाल्यानंतर त्याने अनेक नक्षल कारवायात प्रत्यक्ष सहभाग घेतला आहे. पोलिसांनी या नक्षलवाद्याला न्यायालयापुढे हजर केले असून त्याला २८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. जानेवारी २०२२ पासून आजवर गडचिरोली पोलिसांनी एकूण ६५ नक्षलवाद्यांना अटक केली आहे.
फेब्रुवारी ते मे महिन्यादरम्यान नक्षलवादी देशभर टीसीओसी मोहीम राबवितात. यादरम्यान ते पोलीस दलावर हल्ले आणि शासकीय मालमत्तेचे नुकसान करतात. मात्र याच कालावधीत गडचिरोली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरूवारी गडचिरोली पोलिसांना बेल्ला केसे वेलादी याच्याबद्दल गोपनीय माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीची खातरजमा करून पोलिसांनी दामरंच्या जंगलात विषेष मोहीम राबवली. या मोहिमेदरम्यानच वेलादी पोलिसांच्या तावडीत सापडला. गडचिरोली पोलिसांनी अटक केलेला जहाल नक्षलवादी वेलादी याने आजपर्यंत अनेक हिंसक कारवायांमध्ये सहभाग घेतला आहे.
जनमीलिशिया सदस्य, संड्रा दलम सदस्य अशा विविध पदावर असताना वेल्ला याने अनेक हिंसक कारवाया पार पाडल्या. जाळपोळ, खून, चकमक, दरोडा अशा विविध गुन्ह्यात त्याचा सहभाग होता. टेकामेटा चकमकीदरम्यान त्याने जहाल नक्षल नेता भास्कर याला पळून जाण्यास देखील मदत केली होती. गेल्या अनेक वर्षांपासून तो पोलिसांच्या रडारवर होता.