अकोला

सुख दुःखाविषयी समान दृष्टीच संत लक्षण-हभप चकोर महाराज बाविस्कर

अकोला: सामान्य माणसात व संतात काय भेद आहे. मनुष्य ही जिवात्मा व संत ही जीवात्मा आहेत. दोघांनाही भोग हे लागलेले आहेत. मात्र मनुष्य सुखाने हरळुन जातो, तर दुःखाने त्रासून जातो.उलट संत प्रवृत्ती ही दुखातही त्रासत नाही व सुखाने ही हरळुन जात नाही.

संत प्रवृत्ती ही सुख दुःखाला समान मानत असल्यामुळे संत महात्मे हे पराकोटीला पोहचून मानव कल्याणाची संज्ञा झाली असल्याचा हितोपदेश पारोळा येथील कीर्तनकार हभप चकोर महाराज बाविस्कर यांनी केला.संत जगद्गुरू तुकाराम महाराज बीजोत्सव सेवा समिती च्या वतीने हभप भागवताचार्य प्रशांत महाराज ताकोते यांच्या मार्गदर्शनात स्थानीय कौलखेड मार्गावरील गायत्री नगर येथील मैदानात सुरू असलेल्या कीर्तन महोत्सवात हभप चकोर महाराज बाविस्कर यांनी कीर्तनाचे पंचम पुष्प सादर केले.

नाथ षष्ठी चे औचित्य साधून या किर्तनात बाविस्कर महाराज यांनी संत एकनाथांच्या अभंगावर कीर्तन करून भाविकांना आपल्या ओजस्वी वाणीने मंत्रमुग्ध केले.आळंदी येथील वारकरी शिक्षण संस्थेचे प्रमुख, समन्वय महर्षी शांतीब्रह्म गुरुवर्य हभप मारोती बाबा कुरेकर यांच्या पावन उपस्थितित संपन्न झालेल्या या उत्सवात नाथांचा वैचारिक समाधी उत्सव संपन्न झाला.हभप बाविस्कर महाराज पुढे म्हणाले, भोगांचे परिमार्जन करण्यासाठी जीवाच्या अवताराचे प्रयोजन आहे.जन्माला आल्यानंतर सुखदुःखांचा भोग हा भोगावाच लागतो.

ज्याच्या नियंत्रणात भोगावे लागतात ती म्हणजे प्रकृती होय व भोगाचे इंद्रिय हे माध्यम आहे. सुख दुःख ही प्रारब्धाची खिचडी आहे आणि ही खिचडी प्रत्येकाला खावीच लागते. सुख दुःख भोगत असताना त्याला लागून आलेले द्वंद्व पण भोगावेच लागते. तथापि सुख कोणते व दुःख कोणते हेच मुळी माणसाला कळत नसल्यामुळेच मनुष्य या बाबींच्या कडे जास्त आकृष्ट होतो.नेमकी हीच याची शोकांतिका आहे. हीच खरी अडचण आहे.

सुख हे प्रत्येही दुःखात व दुख हे प्रत्येही सुखात परिवर्तित होत असते.केवळ संत महात्मेच या सुख दुःखाकडे उदास निरपेक्ष भावनेने बघत असतात. ते म्हणाले संत तुकोबारायांनी पण सुखदुःख समान,सकळ जीवांचा कृपाळ हा उपदेश करून सुखदुखाकडे निरीच्छ भावनेने बघण्याचा संदेश दिला असल्याचे सांगितले.ते म्हणाले,हा देह पंच महाभूतांचा बनलेला आहे. मृत्यूनंतर एक तर हा देह अग्नीदाहाच्या रूपाने राखेच्या रूपात उडून जाईल, किंवा हा देह प्राण्यांचे भक्ष झाला तर प्राण्यांच्या माध्यमातून या देहाची विष्ठा होईल, किंव्हा या दोन्ही बाबी देहाच्या संदर्भात नाही झाल्या तर हा देह किड्या मुंग्यांचा पुंजका होईल.

या तीन बाबी शिवाय मृत देहाची गती शक्य नाही.मात्र संतांचा देह या तीन प्रकारात कदापी मोडत नाही. संत महात्मे हे पंचभुतांशी तादात्म पावून एकरूप झाले. कुठल्याही संतांनी या तीन गतीत आपला देह सोडला नाही. तुकोबाराय, नाथ महाराज, माऊली हे या संदर्भातील जिवंत उदाहरणे आहेत.

म्हणून मानवात व संतात हा पराकोटीचा फरक असल्याचे हभप बाविस्कर महाराज यांनी यावेळी सांगितले.यावेळी त्यांनी टायटॅनिक जहाजावर प्रवासाला निघण्याचा बेत आखणार्‍या स्कॉट नावाच्या इसमाची सुरस कथा सांगून प्रारब्धाची महती कथन केली.या सत्रात गुरुवर्य हभप मारोती बाबा कुरेकर व किर्तनकार हभप चकोर महाराज बाविस्कर यांचे समितीच्या वतीने स्वागत करण्यात आले.

शुक्रवार दि १७ मार्च पर्यंत नित्य रात्री ८ ते रात्री १० पर्यंत चालणार्‍या या कीर्तन महोत्सवात दि १५ मार्च रोजी हभप जगन्नाथ महाराज पाटील मुंबई,दि १६ मार्च रोजी वारकरी भूषण हभप उमेश महाराज दशरथे परभणी यांचे कीर्तन होणार आहे. दि १७ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता गुरुवर्य हभप स्वामी महाराज बीड यांच्या काल्याच्या किर्तनाने या किर्तन महोत्सवाची पूर्णाहुती होणार आह